संतांची शिकवण नवीन पिढीत रूजण्यासाठी प्रयत्न करणार


वरणगाव येथील कार्यक्रमात मान्यवरांचा सूर

वरणगाव : नवीन पिढी ही तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमध्ये व्यस्त झाली असून या पिढीला आपल्या थोर संतांनी दिलेली शिकवण समजली पाहिजे व त्यांच्यात रूजण्यासाठी वरणगाव येथील चर्मकार समाजाने संत रविदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना संत रविदास यांचे चरीत्र भेट दिले. हा उपक्रम स्तुत्य असून या माध्यमातून संतांची शिकवण नवीन पिढीत रुजवता येईल, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. संत रवीदास जयंती निमित्त खडखडी रोडवरील संत रविदास भवनांमध्ये कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होत.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, प्रमोद सावकारे, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, चर्मकार समाजाचे विचारवंत संजय भटकर, शिवसेनेचे समाधान महाजन, विलास मुळे, नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

तरच संस्कारक्षम पिढी घडेल
संजय भटकर म्हणाले की, नवीन पिढीला जुन्या गोष्टींचा विसर पडत चालला आहे. वाचनापासून दूर जाऊन ते मोबाईलसारख्या यंत्रामध्ये गुंतलेले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, परीश्रम व चिकाटी याचे महत्त्व रुजवायचे असेल तर संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले गेली पाहिजे. दररोजच्या घडणार्‍या घडामोडींची माहितीही त्यांना मिळाली पाहिजे तरच भविष्यातील एक संस्कारक्षम व चिंतनशील पिढी घडवता येईल. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व धडपडणारे नेतृत्व प्रताप निंबाळकर व हायटेक कॉम्प्युटरचे संचालक राजेंद्र परसे यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन शैलेंद्र अहिरे व प्रमोद सावकारे यांनी तर आभार महेश सपकाळे यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !