गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस ठाण्यात बोकडबळी : एका अधिकार्याचे निलंबन ; आठ कर्मचारी ‘कंट्रोल’ जमा
Goat Sacrifice in Police Station to Prevent Crime: Suspension of an Officer ; Eight employees ‘control’ deposit उदगीर : वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी उदगीर येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर बोकळ बळी देण्यात आल्याचे प्रकरण राज्यात गाजल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षकांची खाते निहाय चौकशी सुरू केली आहे तर पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले असून अन्य आठ कर्मचार्यांना तडकाफडकी कंट्रोल जमा (नियंत्रण कक्ष) केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिस उपअधीक्षकांनी केली चौकशी
उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर बोकडाचा बळी देण्यात आला होता. ग्रामीण हद्दीतील वाढलेल्या गुन्हेगारी कारवाया कमी होण्यासाठी हा बोकडबळी दिल्याची चर्चा असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकताच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने या घटनेची चौकशी उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांच्याकडे सोपवली होती. बुधवारी झालेल्या चौकशीचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना देण्यात आला.


पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन
पोलिस अधीक्षक मुंडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तर कर्मचारी बालाजी घारोळे, प्रताप माने, मुबारक मुल्ला, शिवप्रसाद रंगवाळ, माधव केंद्रे, गणेश मिटकरी, बाळासाहेब गडदे व नजीर बागवान या पोलिस कर्मचार्यांची मुख्यालयी रवानगी करण्यात आली शिवाय पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
