पुण्यासह दिल्लीत दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त


Drugs worth Rs 2,200 crore seized in Pune and Delhi पुणे : दिल्लीत तसेच पुणे शहर पोलीस दलाने गेल्या दोन दिवसात विश्रांतवाडी, कुरकुंभ येथे केलेल्या कारवाईत सुमारे दोन हजार दोनशे कोटींचे 1100 किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केल्याने ड्रग्ज तस्कर हादरले आहेत.

कुरकुंभ एमआयडीसीतून 600 किलो एम.डी.जप्त
गुन्हे शाखेने सोमवारी सराईत गुन्हेगार वैभव ऊर्फ पिंट्या माने व त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन विश्रांतवाडीतील भैरव नगरात असलेल्या एका गोदामामधून 55 किलो ड्रग्जचा साठा जप्त केला तर दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम या कारखान्यावर छापा घातला. या ठिकाणी एमडीची निर्मिती केली जात होती. येथून पोलिसांनी जवळपास 600 किलोपेक्षा अधिक एम.डी.जप्त केले आहे. पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार येथे 1800 किलोची निर्मितीचे लक्ष्य होते. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी आहेत. आजवर पकडण्यात आलेल्या एमडी पैकी हे सर्वात सुपर फाईन क्वालिटीचे एमडी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भल्या पहाटेच कारवाई
पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात पहाटे तीन वाजल्यापासून कुरकुंभ येथील कारखान्यावर कारवाई सुरू केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील अनिल साबळे नावाच्या व्यावसायीकाची ही कंपनी आहे. ऑक्टोबर 2023 पासून कंपनीत मेफेड्रोनचे उत्पादन सुरू होते. डोंबिवली येथील एका व्यक्तीने साबळे याला एमडी तयार करण्याची ऑर्डर दिली आहे.

दोघे पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी कंपनी मालक साबळे आणि त्याच्यासाठी एम.डी.चा फॉर्म्युला तयार करणार्‍या केमिकल इंजिनिअरला ताब्यात घेतले आहे. दरम्यान कंपनीतून पुणे शहर, दिल्ली, मुंबई, मिरा-भाईंदर, बंगलोर आणि हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत एमडीचा पुरवठा झाल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना झाली आहेत.


कॉपी करू नका.