भुसावळातील पेंन्शनर्स कर्मचार्यांचे सोमवारपासून पालिकेसमोर धरणे आंदोलन
भुसावळ : भुसावळ पेन्शनर्स असोसिएशनला सर्वोच्च न्यायालयाने सन 2004 पासून वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे पेन्शन विक्री व इतर सेवानिवृत्त आर्थिक लाभ मिळावा, यासह प्रमुख 15 मागण्यासाठी म्युनिसीपल पेंन्शनर्स कर्मचार्यांनी सोमवार, 24 पासून भुसावळ पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन पालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. पेंन्शनर्स कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे राजकिय गोटात खळबळ उडाली आहे.
24 पासून साखळी उपोषण
सर्वोच्च न्यायालयाने सन 2004 पासून वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे पेन्शन विक्री व इतर सेवानिवृत्त आर्थिक लाभ मिळाला नाही हा लाभ तत्काळ मिळावा, महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व वेतन निश्चिती व सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे, त्याच आदेशात सेवानिवृत्त कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोग लावण्यापासूनचा फरक रोखीने देण्याबाबतचे आदेश असतानाही अद्याप फरक दिलेला नाही हा फरक त्वरीत मिळावा, पीपीओ ऑर्डर देण्यात यावी, भुसावळ शहराचा विस्तार पाहता 100 नागरिकांवर पाच सफाई कर्मचारी लोकसंख्येच्या आधारावर नियुक्त केले जावेत, लाड- पागे समितीने दिलेल्या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना 10, 20 व 30 प्रमाणे कर्मचार्यांना लाभ देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी पेंन्शनर्स कर्मचार्यांनी 27 जानेवारी रोजी पालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले होते. मात्र यानंतरही पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी मोर्चाला जुमानले नाही. यापूर्वी दिलेल्या निवेदनांवरही मुख्याधिकारी डहाळे व तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दखल घेतली नाही. मात्र न्याय व हक्कासाठी आता 24 फेब्रुवारी रोजी पेंन्शनर्स कर्मचारी सकाळी 10 ते 6 वाजेदरम्यान पालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे निदर्शने आंदोलन करणार आहेत, असा इशारा अध्यक्ष एस.एल.पाटील व सेवानिवृत्त कर्मचार्यांनी दिला आहे.



