भुसावळ-बडनेरा-नरखेड मेमूला कोच संख्या वाढवावी
सुविधा कमी गैरसोयीच अधिक : प्रवाशांची भावना
भुसावळ : भुसावळ-बडनेरा-नरखेड मेमूला कोच संख्या वाढवावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे. प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी भुसावळ-नरखेड ही पॅसेंजर बंद करून रेल्वेने सुरू केलेल्या या मेमूमुळे सुविधा कमी व गैरसोयीच अधिक वाढल्या आहेत. दररोज सकाळी 6.30 वाजता भुसावळ स्थानकातून बडनेर्याकडे सुटणारी मेमू वरणगाव स्थानकावरच गर्दीने फुल्ल होते. बोदवड, मलकापूर व नांदूरा स्थानकावर तर गाडीत पाय ठेवण्यासाठीदेखील जागा मिळत नाही. या गाडीतील प्राथमिक सोयी-सुविधांची अवस्था पाहिली की ‘बडा घर, पोकळ वासा’याची जाणीव होते. रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधांची स्वप्ने दाखवताना प्राथमिक सोयी-सुविधा पुरवण्याचे भानही रेल्वे प्रशासनाला नाही.
सामान्य प्रवाशांनाच नेहमी असुविधा
वरणगाव, आचेगाव, बोदवड, कोल्हाडी, खामखेड, मलकापूर, वडोदा, बिस्वाबिज, खुमगाव, नांदूरा, जलंब, शेगाव स्थानकावर आधीच्या पॅसेंजरमध्ये जागा मिळत होती परंतु आता बसण्यासाठी काय उभं राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. सामान्य, महिला व जेष्ठ नागरिकांना असुविधांचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. गाडी वेळेवर चालण्याव्यतिरिक्त सुविधांमध्ये कोणतीही वाढ मेमूमुळे झाली नाही. या उलट गैरसोयीच अधिक झाल्या. प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसणे, आसनक्षमता कमी असल्याने उभे राहून प्रवास करण्याव्यतिरिक्त प्रवाशांना दुसरा पर्याय नाही अश्या असंख्य तक्रारी भुसावळ तालुक्यातील प्रवाशांनी तालुका शिवसेनेच्या पदाधिकार्यांकडे केल्या आहेत.

डब्यांची संख्या 15 पर्यंत वाढवावी
पूर्वीच्या अमरावती-नरखेड पॅसेंजर गाडीच्या तुलनेत सहा डबे मेमू गाडीला कमी आहेत. रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या डब्यांच्या संख्येत 15 पर्यंत वाढ करावी अशी मागणी रेल्वे प्रवाशी तसेच भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


