धक्कादायक : पाचोरा शहरातील विद्यालयात विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या टाकीत कालवले विष
Shocking: In a school in Pachora city, poison was poured into the water tank of the students पाचोरा : शहरातील बी. ओ. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अज्ञातांनी विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 31 मार्च रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास या टाकीतील पाण्याला वास येत असल्याचे शाळेतील सुरक्षा रक्षक प्रशांत गरुड यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी मुख्याध्यापक अतुल बापूराव ठोके यांना फोनवरून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक ठोके यांनीही शाळेत धाव घेतली. त्यांनी शाळेत जाऊन टाकीतील पाण्याची पाहणी केली असता पाण्यावर पांढर्या रंगाचा तवंग दिसून आला व पाण्याला वास येत असत्याचे जाणवले. टाकीजवळ एक पांढर्या रंगाची विषारी बाटली ही आढळून आली.
पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल
अज्ञाताने शाळेतील विद्यार्थ्यांना धोका निर्माण होईल, असे गैरकृत्य केल्याचे मुख्याध्यापक ठोके यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी मुख्याध्यापक ठोके यांनी पाचोरा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिल्यावरून भादंवि कलम 336 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पाण्याचे सॅम्पल हे नाशिक येथील लॅबला पाठविण्यात आले आह. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत पाटील करीत आहे.

