चाळीसगाव नगरपालिकेचा लाचखोर रोखपाल नाशिक एसीबीच्या जाळ्यात
फर्निचर बिलासह डीपॉजिट काढून देण्याच्या मोबदल्यात मागितली तीन हजारांची लाच
चाळीसगाव : चाळीसगाव नगरपरीषदेकडे असलेले फर्निचरचे एक बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात तसेच फर्निचरच्या कामासाठी नगरपरीषदेकडे जमा असलेली डिपॉजीट रकम परत मिळवून देण्याचे मोबदल्यात तीन हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव पालिकेचे रोखपाल संदीप पंडितराव खैरनार (52, दत्तवाडी, दत्तमंदिराजवळ, चाळीसगाव) यांना नाशिक एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडल्याने पालिकेच्या गोटातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
नऊ दिवसांनी आरोपी अडकला जाळ्यात
चाळीसगावातील तक्रारदाराने फर्निचर बिलासह पालिकेकडे असलेली डिपॉजिट मागितल्यानंतर आरोपी खैरनार यांनी 17 रोजी तीन हजारांची लाच मागितल्यानंतर नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदववण्यात आली होती व बुधवार, 26 रोजी दुपारी आरोपीने लाच स्वीकारताच सापळा रचून असलेल्या पथकाने आरोपीला अटक केली. ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर कारभारी निकम, पोलिस निरीक्षक चंद्रसेन बापूराव पालकर, राजेंद्र डांगे, नितीन कराड, वैभव देशमुख, प्रवीण महाजन, विनोद पवार आदींच्या पथकाने केली.



