लोकसभा निवडणूक : भुसावळात वाहनांची कसून तपासणी

प्रांत, डीवायएसपी यांची उपस्थिती : चेक पोस्टवर लावले सीसीटिव्ही कॅमेरे

0

Lok Sabha Elections: Scrutiny of vehicles in Bhusawal भुसावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुरुवार, 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाल्याने शहराच्या चारही बाजूला असलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या चेकपोस्टवर प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी भेट देत स्वत: चेकपोस्टवर वाहनांची तपासणी केली. यावेळी प्रत्येक चेक पोस्टवर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आल्यानंतर येणारे-जाणारे प्रत्येक वाहन सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍यात कैद होणार आहे.

शहराच्या चौफेर चेकपोस्टची उभारणी
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. यामुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. शहराच्या चारही बाजूला चेक पोस्ट सुरू केल्या आहे. शहरात येणार्‍या व जाणार्‍या वाहनांची तपासणी या पथकातील सदस्यांकडून केली जात आहे. गुरूवारपासूनच चारही चेकपोस्ट सुरू झाल्या आहेत. गुरूवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी चेक पोस्टला भेट देत रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या वाहनांची डीक्की उघडून तपासणी केली. गाडीचा नंबर, कुठून आली, कुठे जात आहे याची माहिती नोंद करण्यात आली. अधिकार्‍यांनी कुर्‍हेपानाचे, बोहर्डी फाटा, जॉली पेट्रोल पंपाजवळ आणि यावल रोडवर फॉरेस्टच्या नाक्याजवळ असलेल्या चेकपोस्टला भेटी दिल्यात. कर्मचार्‍यांना कामाच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या.

कर्मचार्‍यांना कुलरची व्यवस्था
हल्ली तापमान वाढले असल्याने चेकपोस्टवर असलेल्या कर्मचार्‍यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली शिवाय सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून एक व्हिडीओ शुटींगचा कॅमेरा ठेवण्यात आला असून पोलीस व महसूल कर्मचार्‍यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.