घरपोच स्वीकारली पाच हजारांची लाच : धुळ्यातील राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक पोलीस कोठडीत

0

धुळे :  कर्मचार्‍यांची गैरहजेरी टाळण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना धुळ्यातील राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक अर्थात पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांना धुळे एसीबीने सोमवार, 22 एप्रिल दुपारी अटक केली होती. पारसकर यांना मंगळवारी दुपारी धुळे न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे कार्यरत नर्सिंग ऑफिसर या प्रकरणात तक्रारदार आहेत. तक्रारदार व त्यांच्यासोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर असे 14 व 15 एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला व पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावत त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचार्‍यांकडुन प्रत्येकी एक हजारांप्रमाणे पाच हजारांची लाच मागितली व पैसे न आणल्यास सर्वांची बिनपगारी करेल, असे दम भरला.

तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली. पारसकर यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली मात्र संशय आल्यानंतर त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली. यानंतर एसीबीने पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे.


कॉपी करू नका.