फैजपूरकरांना दिलासा : करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प सादर


फैजपूर : सन 2020-21 वर्षांचा अंदाजपत्रक 43 कोटी 23 लाख एक हजार 329 रुपये महसुलाचा व 75 हजार 547 रुपये शिल्लकिचा अंदाजपत्रकाला फैजपूर पालिकेने मंजुरी दिली. विशेष म्हणजे अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ करणयात आली नसल्याने नागरीकांना दिलासा मिळाला असून या अर्थसंकल्पातून फैजपूर शहरात रस्ते व सार्वजनिक तसेच पंतप्रधान आवास योजनेसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पालिका सभागृहात अर्थसंकल्पीय सभा
गुरुवार, 27 रोजी सकाळी 11 वाजता फैजपूर पालिकेच्या सन 2020-21 या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रक मंजुरीसाठी सभेचे आयोजन पालिका सभागृहात करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी नगराध्यक्षा महानंदा होले यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केला. लेखापाल निलेश दराडे यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले. यावेळी 2020-21 या वित्तीय वर्षात महसुली जमा 43 कोटी 23 लक्ष 1329 तर महसुली खर्च 44 कोटी 83 लक्ष 32 हजार 427 खर्चाची तरतूद करून 75 हजार 547 शिल्लक तसेच भांडवली जमा 25 कोटी 75 लक्ष व भांडवली खर्च 24 कोटी 95 लक्ष अशी एकूण 43 कोटी 23 लक्ष 1329 जमेचा अंदाज करण्यात आला. या रकमेतून शहरातील विविध विकास कामे दैनंदिन मूलभूत खर्च भागविण्यासाठी 44 कोटी 83 लक्ष 32 हजार 427 ची तरतूद करण्यात आली आहे. शहरात नवीन रस्ते करण्यासाठी विशेष रस्ता अनुदानातून पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरात गोरगरीब बेघर लोकांकरिता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसेच स्वच्छ शहर सुंदर शहर याविषयी शहरात घनकचरा प्रकल्प राबविणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे यासाठी 14 व्या वित्त आयोग अनुदान स्वच्छ सर्व्हेक्षण अनुदानातून एक कोटी 50 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. नागरीकांना कोणताही भुर्दंड नसलेल्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण तर भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, काँग्रेस गटनेता कलिम खा मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी लेखापाल निलेश दराडे, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पंकज पन्हाळे, नगर रचनाकार उज्वल सोनवणे, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंखे, वरीष्ठ लिपिक दिलीप वाघमारे यांनी काम पाहिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !