रावेरात निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्राँग रुमची पाहणी

0

रावेर : रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 मे रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रशासनाद्वारे तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाव्दारे निवडणूक निरीक्षकांची प्रत्येक लोकसभा क्षेत्रासाठी निवडणूक निरीक्षक यांची नेमणूक केली आहे. निवडणूक निरीक्षक अशोककुमार मीना (भाप्रसे) व निवडणूक पोलीस निरीक्षक प्रियंका मीना (भापोसे) भारत निवडणूक आयोग यांनी रावेरातील लोकसभा निवडणूक कामकाजाची तयारीची पाहणी केली.

स्ट्राँग रूमची केली पाहणी
निरीक्षक अशोककुमार मीना यांनी प्रथम स्ट्राँगरूमची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेरा, अग्निशमन यंत्रणा, सुरक्षेबाबत पाहणी करण्यात आली तसेच प्रशासनामार्फत निवडणूक कामी सर्व कामकाजाबाबत तयार करण्यांत आलेल्या कंट्रोल रूमची पाहणी करून त्यात प्रामुख्याने एक खिडकी कक्ष, मिडीया कक्षाची पाहणी करुन कामकाजाची माहिती घेण्यात आली. निवडणूककामी नियुक्त केलेल्या सर्व सेक्टर अधिकारी यांचा आढावा घेण्यात आला. मतदान अधिकारी, कर्मचारी यांना संभाव्य अडचणीबाबत चर्चा करुन मतदानाच्या दिवशी येणार्‍या विविध परिस्थितीतील अडचणींबाबत व मतदानाच्या दिवशी करावयाचे मॉक पोल, फॉर्म नं.17 ए, तसेच 17 सी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कामकाज पारदर्शी व योग्य प्रकारे करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

रावेरच्या संवेदनशील मतदान केंद्राला भेट
निवडणूक निरीक्षक अशोककुमार मीना यांनी मतदान केंद्रातील सुविधांचा आढावा घेतला. रावेर शहरातील मतदान केंद्र क्र. 106 या केंद्रास भेट देऊन तेथील सर्व सुविधांची पाहणी केली. निवडणूक निरीक्षक अशोककुमार मीना यांनी रावेरातील निवडणूक कामकाजाची पाहणी केली. सहा.निवडणूक निर्णय अधिकारी देवयानी यादव यांच्या मार्गदर्शाखाली सुरू असलेल्या निवडणूक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी देवयानी यादव (भाप्रसे), जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, रावेर तहसीलदार बंडु कापसे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल व नायब तहसीलदार, क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.