जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल


Seven Code of Conduct cases filed in Jalgaon and Raver Lok Sabha constituencies जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आचारसंहितेच्या काळात जळगाव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आले. आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी तीन तर मद्य प्राशन करुन धुमाकूळ घातल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. अनधिकृतपणे बंदी असलेला गुटखा व मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याकालवधीत आठ लक्ष 65 हजार 100 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली तर पाच लक्ष 19 हजार 787 रुपयाचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जामनेरात विना परवानगी सभा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कालावधीत आचारसंहिता भंग तसेच निवडणूकीवर परिणाम करू शकतील असे अवैध प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी जिल्हाभरात मोठी कामगिरी केली. त्यात जामनेर येथे विनापरवानगी प्रचार सभा घेतल्या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यासोबतच अवैधपणे गांज्याची वाहतूक, प्रतिबंध असलेल्या गुटख्याची वाहतूक तसेच अवैधरित्या मद्याचे वाहतूक, निवडणूकी विषयी विनाकारण अफवा पसरविणे, मद्य प्राशन करुन निवडणूक कर्मचार्‍यांशी अरेरावी करणे तसेच ईव्हीएम मशीन्सचे प्रात्यक्षिक सुरू असतांना विनापरवानगी छायाचित्र काढणे याबाबतीत जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भडगांव, पाचोरा, पहूर, जळगाव तालुका, पारोळा, मलकापूर या पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. त्याबरोबरच जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या नाका तपासणी पथकाला एम.एच.19 सी.झेङ 8569 या कारमध्ये 08 लक्ष 65 हजार 100 रुपये आढळुन आले आहे. या प्रकरणी तक्रार जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे.



एक हजार 989 मतदान केंद्रावर करण्यात आले वेब कास्टिंग
जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोनही मतदार संघातील 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेदरम्यान घडणारे अनुचित प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रथ्मच वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आली होती. या वेब कास्टिंगचे लाईव्ह प्रसारण पाहण्यासाठी अल्प बचत भवनात स्वतंत्र कंट्रोल रुम उभारण्यात आले. जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात 01 हजार 989 मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कास्टिंग करण्यात आले. त्यात जळगांव लोकसभा मतदार संघातील जळगांव शहर विधानसभा मतदार संघात 182 मतदान केंद्रे, जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघात 170 मतदान केंद्रे, अमळनेर विधानसभा मतदार संघात 160 मतदान केंद्रे, एरंडोल विधानसभा मतदार संघात 145 मतदान केंद्रे, चाळीसगांव विधानसभा मतदार संघात 170 मतदान केंद्रे, पाचोरा विधानसभा मतदार संघात 166 मतदान केंद्रे असे एकुण जळगांव लोकसभा मतदार संघात 993 मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात आले.

तर रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा विधानसभा मतदार संघात 160 मतदान केंद्रे, रावेर विधानसभा मतदार संघात 150 मतदान केंद्रे, भुसावळ विधानसभा मतदार संघात 207 मतदान केंद्रे, जामनेर विधानसभा मतदार संघात 165 मतदान केंद्रे, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात 162 मतदान केंद्रे, मलकापुर विधानसभा मतदार संघात 152 मतदान केंद्रे असे एकुण रावेर लोकसभा मतदार संघात 996 मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात आले.

262 सुक्ष्म निरीक्षकांच नियुक्ती
जळगाव लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील सुश्म हालचाली टिपण्यासाठी जळगांव लोकसभा मतदार संघात येणार्‍या सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर एकूण 262 सुश्म निरीक्षक नेमण्यात आले होते, तर लोकसभा मतदार संघात 528 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !