भुसावळकरांना दिलासा : अर्थसंकल्पात करवाढ नाहीच
152 कोटींच्या अर्थसंकल्पाची सभा अवघ्या 16 मिनिटात गुंडाळली : 67 लाख 70 हजार शिलकीचा अर्थसंकल्प मांडला
भुसावळ : भुसावळ पालिकेच्या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ नसल्यान भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात अर्थसंकल्पासाठी बैठक झाली मात्र या बैठकीत केवळ सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारी व्यतिरीक्त सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी कुठलीही चर्चा न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. 11 वाजून 22 मिनिटांनी वाजता सुरू झालेली सभा 11 वाजून 28 मिनिटांनी संपल्याचे जाहीर करण्यात आले. वास्तविक नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग असलेल्या भुसावळ पालिकेने तब्बल 152 कोटींचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यात सत्ताधारी व विरोधकांनी चर्चा करणे आवश्यक असताना तसे काही न घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे अर्थसंकल्पाची प्रत अजेंड्यासोबत देणे क्रमप्राप्त असताना पालिका सभागृहात नगरसेवकांना ती देण्यात आली.
करवाढ नसल्याचा शहरवासीयांना दिलासा
शुक्रवारी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी सभागृहात नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी करुणा डहाळे व पालिका कर्मचारी, नगरसेवक सभागृहात दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षा 11 वाजून 12 मिनिटांनी सभेला सुरुवात झाल्यानंतर 16 मिनिटांच्या सभेत नगरसेवक युवराज लोणारींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर 11 वाजून 28 मिनिटांनी अर्थसंकल्पाला बहुमताने मंजूरी देवून सभा आटोपणयात आले. 67 लाख 70 हजार 742 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प असल्याचे नगराध्यक्षांनी सांगत भुसावळकरांवर करवाढीचा कुठलाही बोजा टाकण्यात आला नसल्याचे सभागृहाला सांगितले.

घनकचर्यावर चर्चा अधिक
अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल संजय बाणाईत करीत असताना सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारी यांनी घनकचरा व्यवस्थापन शुल्क करांच्या रकमेबाबत तक्रार केली. नागरीकांना 360 रुपये करात समाविष्ट झाल्याने त्याबाबत खुलासा करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यानंतर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी यांनी शासनाने घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणी बंधनकारक केली असल्याने अखेरच्या क्षणाला शासनाचे सक्त निर्देश असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती दिली. उपमुख्याधिकारी महेंद्र कथोरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाची घरगुती, व्यवसायीक व विविध कॅटेगिरीनुसार आकारण्यात येणार्या शुल्काची माहिती दिली. यासोबतच नगरसेवक लोणारी यांनी अर्थसंकल्पातील शॉपींग सेंटरपासून मिळणार्या उत्पन्नातील रक्कमेत तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर स्थायी सभेसमोर मंजुरीसाठी अर्थसंकल्प येईल, त्यावेळी त्यात सुधारणा करण्याची माहिती प्रशासकीय अधिकार्यांनी दिली. अर्थसंकल्पीय सभेपूर्वी अंदाजपत्रकाचे वितरण झाल्यास त्यावर अभ्यास करून बोलता येते, असा मुद्दा लोणारी यांनी मांडल्यानंतर तो मान्य करण्यात आला.
अर्थसंकल्पात अशी आहेत तरतूद
अर्थसंकल्पात नवीन वस्त्यांमध्ये रस्त्यांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अल्पसंख्याक योजनेंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व शौचालये बांधण्यासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे, शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारणी करण्यासाठी 55 लाखांची तरतुद करण्यात आली, जलनिस्सारण होण्यासाठी गटारी बांधकाम करण्यासाठी नगरपालिका फंडातून चार कोटी 50 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.


