आमोदा गावातील जेडीसीसी बँक जळून खाक : 57 लाखांचे नुकसान

बँकेची लाखोंची रोकड सुरक्षित : रात्री उशिरा आगीवर नियंत्रण

0

JDCC bank in Amoda village burnt down : loss of 57 lakhs फैजपूर : जवळच असलेल्या आमोदे, ता.यावल येथील श्रीराम मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या जेडीसीसी बँकेच्या शाखेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मंदिराचा उत्तरेकडील अर्धा भाग जळून खाक झाला आहे. ही आग गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लागली मात्र रात्री तीन वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवता आले. आगीमुळे बँकेचे फर्निचर, कागदपत्र सर्व जळून खाक झाले असलेतरी रोकड मात्र सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या आगीत श्रीराम मंदिरातील 48 लाख 85 हजार 900 रुपयांच्या मंदिरातील वस्तू तर सात लाख 62 हजार रुपये किंमतीचे जेडीसीसी बँकेचे डेड स्टॉक व संगणक आदी जळून खाक झाले.

दोन मजल्यांचे पूर्ण नुकसान
श्रीराम मंदिरावर असलेला झेंडा आणि गाभार्‍यात विराजमान श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईसह इतर देवतांना आगीची सुदैवाने झळ बसली नाही. पुरातन, तीन मजली सागवानी लाकडाचा ढाचा असलेले मजबूत बांधकामाचे मंदिर असल्याने उत्तरेकडील व वरील दोन मजल्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. मंदिराच्या दक्षिणेकडील तळमजल्याचा काही भाग सुरक्षित आहे. गुरुवारी रात्री आगीची माहिती जसजशी परिसरात पसरली तसतसे फैजपूर, सावदा, भुसावळ, यावल, रावेर येथील अग्निशमन बंबानी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. फैजपूर, सावदा, हिंगोणा, न्हावी, बामणोद, पाडळसा, भालोद, भुसावळ येथील राजकीय सामाजिक पदाधिकार्‍यांसह असंख्य कार्यकर्ते आमोद्यात धावून आले.

शासकीय कर्मचारी तलाठी, ग्रामसेवक, वीज वितरण कंपनीचे कर्मचार्‍यांचा स्थानिक रहिवास नसल्याने नागरिकांचा संताप झाला. जेडीसीसी बँकेचे दूध फेडरेशन डेअरीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. बँकेचे कामकाज ऑनलाईन असल्याने संपूर्ण डाटा सुरक्षित असल्याने खातेदारांनी चिंता करू नये तसेच बँक लॉकर तळमजल्यावर असल्याने रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेचे शाखाधिकारी जावळे म्हणाले.


कॉपी करू नका.