भुसावळ रेल्वे प्रशासनाला ‘अल्झायमर’ आजार : जळगावच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन


एडीआरएम मनोज सिन्हांना गुलाबपुष्पासह दिले नारळ पाणी

भुसावळ : जळगावातील रेल्वे हद्दीतील प्रलंबित प्रश्‍नांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याने जळगावचे माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी शुक्रवारी अभिनव आंदोलन करून एडीआरएम मनोज सिन्हा यांना गुलाबपुष्पासह नारळ पाणी देत मागण्यांबाबत निवेदन दिले. रेल्वे प्रशासनाला समस्या सोडवण्याचा विसर पडल्याने थेट मंडळ रेल प्रबंधक प्रशासनाच्या नावाने जिल्हा रूग्णालयातून केस पेपर काढत त्यात अल्झायमर (विस्मरण) नावाचा आजार झाल्याचे नमूद करीत रेल्वेचे वय 60 वर्ष नमूद करण्यात आले शिवाय वैद्यकीय अधिकार्‍यांना तूर्ततरी या आजारावर उपचार नसल्याचा शेरा दिल्याने हा अजब केस पेपर एडीआरएम यांना भेट देण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाने प्रचंड खळबळ उडाली.

रस्ता दुरुस्तीसाठी अनोखे आंदोलन
जळगावातील रेल्वे पूलाचे काम सुरू करण्यात आल्याने शिवाजी नगरातील रहिवाशांना शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी तेथील रहिवाशांसोबत 27 मार्च 2019 या दिवशी जळगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून आंदोलकांना लेखी पत्र देत आश्वासन देण्यात आले तर आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाकडून भोईटे नगर मालधक्का मार्गे असलेला रेल्वे हद्दीतील रस्ता सर्वसामान्य नागरीकांना वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला तर सुरत रेल्वे गेटपासून भोईटे नगर मालधक्का रस्त्याचा काही भाग अतिशय खराब असल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्त्यावरील धुळीचा त्रासही होत असल्याने या परीसरातील नागरीकांनी रेल्वे प्रशासनाकडे हा रस्ता दुरूस्तीची मागणी केली. त्यामुळे 15 मे 2019 पर्यत रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन रेल्वे विभागातर्फे दीपककुमार यांनी 25 मार्च 19 यादिवशी दिले होते. याबाबत तातडीने कार्यवाही होण्यासाठी दीपककुमार यांनी जळगाव मनपा आयुक्त यांना विनंती केल्याने आयुक्त यांनीही रेल्वे प्रशासनाला पत्र दिले. त्यानंतरही रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी यांनी 30 ऑगस्ट 19 या दिवशी डीआरएम यांना स्मरणपत्र दिले होते तसेच रेल्वेचे अधिकारी दीपककुमार यांना वारंवार मोबाईल संपर्क करून रस्ता दुरूस्तीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतरही रेल्वे प्रशासनाकडून रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ अभिनव मार्गाचा अवलंब करीत जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात जात रेल्वे विभागाचे वय 60 वर्षे दर्शवून त्यांच्या या विसरभोळेपणाचा उल्लेख करून केस पेपर काढला. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी हा विसरभोळेपणाचा गंभीर आजार असल्याचे निदान केले. या आजारावर कुठलाही उपाय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाला झालेल्या या आजारामुळे विभागातून धावणार्‍या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना धोका संभवू शकतो, असे गुप्ता यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतांना दीपककुमार गुप्ता, अमीत पिसाळ, श्रीकांत एरेडे, राजेद्र पिसाळ, विलास सागोटे व शेख इकबाल आदी उपस्थित होते.

एडीआरएम यांना दिले नारळ पाणी
रेल्वे प्रशासनाला झालेल्या विस्मरणाच्या आजारामुळे प्रकृती चांगली राहावी यासाठी उपस्थितांनी एडीआरएम सिन्हा यांना नारळ पाणी देण्यात आल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. दरम्यान, ममुराबाद रेल्वे पूलाखालील मार्गावर असलेला रेल्वे मार्गावरील स्लॅब हा तोकडा असल्याने गाडी जात असतांना अथवा थांबली असतांना पूलावरून मलमूत्र युक्त घाण पूलाखालून जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर पडते.त्यामुळे या स्लॅबची तातडीने उपाय योजना करावी, जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म पाचवरी पादचारी पूलाचा जीना जेथे उतरतो तेथे रेल्वे स्टेशन मधून येण्यास व जाण्यास सोईस्कर असा मार्ग असून त्ेथील गेट बंद केले आहे, ते सुरू करावे , रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाकडून 15 मे 19 पर्यत रस्ता दुरूस्त केला जाईल या आशयाचे पत्र दिले होते, तो रस्ता आता 15 मे 20 पर्यत चांगला करावा, अशी मागणी करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !