नांदूरा-जलंब सेक्शनमध्ये स्वयंचलीत सिग्नल यंत्रणा यशस्वी

स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे सेक्शनमध्ये अधिक गाड्या धावणार !

0

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदूरा-जलंब सेक्शनमध्ये स्वयंचलित सिग्नल यंत्रणा लावण्यात आली असून ही यंत्रणा यशस्वी झाली आहे. यामुळे सेक्शनमध्ये आता एका पाठोपाठ एक रेल्वे गाड्या धावण्यास वेळ मिळणार आहे.

नांदूरा ते जलंब सेक्शनमध्ये सिग्नल यंत्रणा
मध्य रेल्वेतील भुसावळ विभागात स्वयंचलित सिग्नल यंत्रणा लावण्यावर भर दिला जात आहे. याच धर्तीवर नांदूरा ते जलंब या सेक्शन दरम्यान ही यंत्रणा लावण्यात आली असून याचसाठी सोमवार, 6 रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला. याच काळात ही सिग्नल यंत्रणा लावल्याने यामुळे हा सेक्शन आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणेत आला आहे. भुसावळ-बडनेरा मार्गावरील 12.20 किलोमीटरच्या नांदुरा-जलंब विभागात स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा लावण्यासाठी ब्लॉक घेतला होता.

अधिक गाड्या धावण्यास मदत होणार
ही यंत्रणा यशस्वीरित्या कार्यान्वित झाली. हे काम सुरू झाल्यानंतर एक परिपूर्ण ब्लॉक विभाग (नांदुरा आणि जलंब स्टेशन दरम्यान) स्वयंचलित ब्लॉक विभागात रुपांतरित झाला आहे. यामध्ये 18 स्वयंचलित सिग्नल आणि पाच सेमीऑटोमॅटिक सिग्नल आहेत. स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली म्हणजे वाहतुकीच्या घनतेनुसार अंदाजे प्रत्येक एक किमी अंतरावर किंवा 400 मीटर अंतरावर सिग्नल लावणे, जेणेकरून जास्त गाड्या चालवता येतील. एक गाडी एकदा सिग्नल पास केल्यानंतर, गाडी पुढच्या स्टेशनवर पोहोचण्याआधीच, त्याच्या मागून दुसरी गाडी पाठवली जाऊ शकते. आणि या सिस्टीममध्ये सिग्नल्सची संख्या वाढवली असल्याने जास्त गाड्या पाठवता येतील. आता या स्थानकादरम्यान विभागांमध्ये प्रत्येक एक किमी अंतरावर सिग्नल बसवले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक एक किमी अंतरावर सेक्शनमध्ये एक गाडी धावू शकते. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि गाड्यांचा खोळंबा कमी होईल, यामुळे जास्त गाड्या चालवता येतील.


कॉपी करू नका.