भुसावळातील चोरीचा उलगडा : आरोपीस अटक


भुसावळातील गवळीवाड्यात कुटुंब लग्नाला गेल्याने चोरट्याने साधली होती संधी : 20 हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने जप्त

भुसावळ : शहरातील गवळीवाड्यात कुटुंब लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्याने 20 हजारांच्या रोकडसह अन्य सोन्या-चांदीचे दागिने लांबवले होते. 19 ते 20 फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली होती. या चोरीचा उलगडा करण्यात भुसावळ शहर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले असून मुक्तार इमाम गवळी (25, गवळीवाडा, भुसावळ) यास अटक करण्यात आली आहे. आरोपीने चोरीची कबुली देत चोरीतील 20 हजारांच्या रोकडसह अन्य सोन्या-चांदीचे दागिनेदेखील काढून दिले आहेत.

घर बंद असल्याची साधली होती संधी
गवळीवाड्यातील रहिवासी व तक्रारदार मो.शोहेब मो.सादीक (गवळीवाडा, भुसावळ) यांच्या घरातील सदस्य लग्नानिमित्त 19 रोजी बाहेरगावी गेल्याने आरोपी मुक्तार गवळीने संधी साधली. घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील 20 हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने तसेच एटीएम कार्ड लांबवत चोरट्याने सीसीटीव्हीचे नुकसान केले होते. 20 रोजी सादीक कुटुंबातील सदस्य घरी परतल्याने चोरी उघडकीस आल्याने शहर पोलिसात गुरनं.31/2020, भादंवि 454 व 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एटीएम वापरले अन चोरटा अडकला बेडीत
मो.सादीक यांच्या घरातून एटीएम लांबवल्यानंतर चोरट्याने त्याचा रक्कम काढण्यासाठी वापर केल्याने तो अलगद पोलिसांच्या बेडीत अडकला. आरोपीने ज्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेथून सीसीटीव्ही फुटेज मिळवल्यानंतर आरोपीच्या शनिवारी मुसक्या आवळण्यात यश आले. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली 20 हजारांची रोकड व 20 हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय कंखरे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख मोहम्मद वली सैय्यद, समाधान पाटील आदींच्या पथकाने केली. तपास सहाय्यक फौजदार संजय कखरे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !