भुसावळातील ताप्ती स्कुलच्या दोघा विद्यार्थ्यांना मारहाण
भुसावळ : दहावी परीक्षा देण्यासाठी शहरातील केंद्रीय विद्यालयात आलेल्या ताप्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांना टोळक्याने मारहाण केल्याची घटना शनिवार, 29 रोजी दुपारी दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विद्यार्थी ओम चौधरी तसेच रोहन पाटील हे जखमी झाले. शहरातील केंद्रीय विद्यालयामध्ये सी.बी.एस.सी.बोर्डाची दहावीची परीक्षा सुरू असून गुरूवार, 26 फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरला देखील या विद्यार्थ्यांचा वाद झाला होता तसेच 29 रोजी पुन्हा तरुणांच्या टोळक्याने दोघा विद्यार्थ्यांना मारहाण केली. रोहन नरेंद्र पाटील या विद्यार्थ्याच्या चेहर्यावर फायटरने मारहाण केल्याने त्यास गंभीर दुखापत झाल्याने जळगावात उपचारार्थ हलवण्यात आले तर ओम चौधरी यासदेखील नखांनी ओरबाडण्यात आले असून त्यास मुक्का मार लागला आहे. विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यानंतर दुपारी मोठ्या संख्येने विद्यार्थी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत कारवाईचे आश्वासन दिले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


