रावेरात शिक्षक कॉलनीत धाडसी घरफोडी : सव्वा लाखांचा ऐवज लंपास
रावेर : रावेर शहरातील शिक्षक कॉलनीत बंद घराचा कडी-कोयंडा कुलूप तोडून चोरट्यांनी 50 हजारांच्या रोकडसह 75 हजारांचा सोन्याचा ऐवज मिळून सव्वा लाख रुपंयाचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यााविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
रावेर शहरातील शिक्षक कॉलनीत सेवानिवृत्त सत्यवती देविदास तायडे वास्तव्यास आहेत. अक्षयतृतीयेनिमित्त त्या बोदवडस्थित मुलगा संघरत्न तायडे यांच्याकडे 9 मे पासून गेल्या होत्या. चोरट्यांसाठी ही बाब आयतीच पर्वणी ठरल्याने त्यांनी घरफोडी केली तर सोमवार, 20 रोजी शेजार्यांनी घर उघडे दिसल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचा अंदाज आल्याने त्यांनी तायडे यांना कल्पना दिली. फिर्यादी सत्यवती व त्यांचा मुलगा संघरत्न हे तातडीने घरी आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. घरात सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आला तर दोन्ही लोखंडी कपाट उघडे दिसले.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
कपाटाचे लॉकर तपासल्यानंतर त्यातून 30 हजार रुपये किंमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची गहू मण्याची पोत, 30 हजार रुपए किंमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 15 हजार रुपए किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 50 हजारांची रोकड मिळून एकूण एक लाख 25 हजारांचा ऐवज चोरी गेल्याचे उघडकीस आले. अज्ञात चोरट्यांनी 9 ते 20 मे च्या दरम्यान कुलूप तोडून घरफोडी केल्याप्रकरणी सत्यवती तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.