जळगावातील सौरभ ज्वेलर्सवरील दरोड्याची उकल : सख्ख्या भावंडासह तिघांना बेड्या


Robbery at Saurabh Jewelers in Jalgaon solved : Three along with Sakkhya’s sibling are in chains जळगाव : जळगावातील शनीपेठ हद्दीतील सौरभ ज्वेलर्सवर चॉपरचा धाक दाखवून धाडसी दरोडा दोन दिवसांपूर्वी टाकण्यात आला होता. या गुन्ह्याची उकल करण्यात जळगाव शनीपेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सहा पैकी तीन दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. एकाला पुण्यातून तर उर्वरित दोन जणांना शहरातील राजीव गांधी नगरातून अटक करण्यात आली.

सख्ख्या भावंडांना अटक
सागरसिंग जीवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी (सर्व रा. राजीव गांधी नगर, जळगाव) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. तिघे दरोडेखोरे हे सख्खे भाऊ आहेत.

पहाटेच्या सुमारास पडला दरोडा
जळगाव शहरातील सराफ बाजारातील भवानी मातेच्या मंदिरासमोर सौरभ ज्वेलर्स या दुाकनात सोमवार, 20 मे रोजी पहाटे 3.30 ते 4.15 वाजेच्या दरम्यान तीन दुचाकींवर आलेल्या अज्ञात सहा दरोडेखोरांनी सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या पाठीमागून येऊन मागचे चैनल गेट कटरने तोडले. त्यानंतर लाकडी दरवाज्याच्या लहान खिडकीतून आत प्रवेश केला. दरम्यान या दुकानात नेहमी झोपणारे दोन कर्मचारी यांना लोखंडी चॉपरचा धाक दाखवत शांत बसण्याचे सांगितले आणि इतरांनी कटरच्या सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडले व आत प्रवेश केला. या दुकानातून दरोडेखोरांनी सोन्याचे-चांदीचे दागिने, चांदीचे शिक्के व इतर मुद्देमाल असा एकूण 32 लाख 29 हजार 574 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सायंकाळी पाच वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भावंड असलेल्या आरोपी दरोडेखोरांना बेड्या
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गावीत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह पथक दाखल झाले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. यात दोन पथक तयार करून एक जळगावात आणि एक दुसरे पुण्याला रवाना केले. पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सागरसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी यांना जळगावातून अटक केली तर रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी याला पुण्यातून अटक केली आहे. दरम्यान अटक केलेले तीनही दरोडेखोर हे सख्खे भाऊ आहेत तर इतर फरार झालेले दरडखोर हे त्यांचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे.

दोघांविरोधात हद्दपारीचे आदेश
दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे यातील सागरसिंग जुन्नी आणि रणजितसिंग जुन्नी या दोघांवर चोरी, हाणामारी, धारदार शस्त्र वापरून दमदाटी करणे असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीसात दाखल आहेत. त्यामुळे या दोघांना डिसेंबर 2022 मध्ये जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश तत्कालिन जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !