चाळीसगावात 7 व 8 मार्चला विनामूल्य प्लास्टिक अॅण्ड हॅन्ड सर्जरी शिबिर
चाळीसगाव : शहरात रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे शनिवार, 7 मार्च व रविवार, 8 मार्च रोजी विनामूल्य प्लास्टिक सर्जरी अॅण्ड हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मागील 18 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या शिबिरात गरीब रुग्णांवर पुणे आणि मुंबई येथून आलेले नामांकित आणि तज्ज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत. यामध्ये फाटलेले ओठ, तुटलेली बोटे, जळाल्यामुळे चिकटलेली कातडी, चेहर्यावरील गोंधण, जखमेच्या खुणा इत्यादी प्रकारचे व्यंग असणार्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया आणि नंतर औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. अविवाहित मुली आणि स्त्री रुग्णांना प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी रोटे.बलदेव पुंशी व रोटे.संदीप देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवार, 6 मार्च रोजी दुपारी तीन वाजता शस्त्रक्रियेसाठी पूर्व तपासणी व निवड करण्यात येणार आहे. तपासणी फी केवळ पन्नास रुपये असून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी महावीर हॉस्पिटल, चाळीसगाव तसेच बापजी हॉस्पिटल, हिरापूर रोड व साई कृष्ण हॉस्पिटल, लक्ष्मी नगर चाळीसगाव येथे संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


