सिनेस्टाईल पाठलागानंतर चोपडा पोलिसांच्या जाळ्यात अडकले दोंडाईतील कुविख्यात दरोडेखोर


चोपडा : चोपडा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दोंडाईचा शहरातील कुविख्यात दोन दरोडेखोरांना पकडले असून अन्य तिघे मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. चोपडा शहरातील जुना शिरपूर रस्त्यावरील श्रीकृष्ण कॉलनी भागातील एका घरात दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास दरोडा टाकला आणि 9 हजार 500 रुपये, बँकेचे पासबुक, आधार कार्ड चोरले व याचवेळी कुटूंबाने आरडा-ओरड केल्यानंतर सतर्क शेजार्‍यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर चोपडा पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग करत दोन दरोडेखोरांना पकडले मात्र अंधाराचा फायदा घेत तिघे पसार झाले. कौसर मुसा खाटीक (27) व देवेंद्र युवराज काकडे (30, दोन्ही रा.दोडाईचा),असे अटकेतील संशयितांची नावे आहेत.

पहाटेच्या सुमारास दरोडा
नवल ओंकार पाटील यांच्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनात पाच दरोडेखोरांनी घराच्या कंपाउंडचे व दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. पाच दरोडेखोरांपैकी दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून नवल पाटील यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. कपाटात ठेवलेले 1500 रुपये, स्टेट बँकेचे पासबुक, आधार कार्ड पिशवीसह बाब जबरदस्तीने चोरून नेले. दरम्यान, घरातील आरडा-ओरडचा आवाज ऐकून शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलीस येत असतांना सायरनचा आवाज ऐकून दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी धरणगावरोड पर्यंत त्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग केला.

तिघे संशयीत पसार
अखेर पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले तर तिघे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. कौसर मुसा खाटीक व देवेंद्र युवराज काकडे या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली तर बात सुलतान खालीक पिंजारी, राजा कुरेशी व एक अनोळखी असे एकूण तीन जण पसार झाले आहेत. अटकेतील दोघांना चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरोडेखोरांच्या ताब्यातून साडेतीन हजाराची रोकड, दोन मोबाईल, दोन कोयते, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ब्रेझा गाडीत दुसर्‍या तीन वेगवेगळ्या नंबर प्लेट देखील पोलिसांना सापडल्या आहेत. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र कल्टे यांच्या मार्गदर्शनात पथकाने कारवाई केली. दरम्यान, गुन्ह्यातील सर्वच आरोपी हे सराईत गुन्हेगार असून दोंडाईचा इथे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास एपीआय प्रशांत कंडारे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !