जळगाव शहर खुनाने हादरले : सुप्रीम कंपनीतील कर्मचार्याची निर्घृण हत्या
Jalgaon city shaken by murder : brutal murder of an employee of Supreme Company जळगाव : जळगावातील सुप्रीम कंपनीत कामाला असलेल्या कर्मचार्याची गळा चिरुण निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवार, 3 जून रोजी पहाटे उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिनाभरात हा दुसरा खून असून ललित प्रल्हाद वाणी (45, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, शिविगाळ झाल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती असून तीन संशयीतांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्य चौकात आढळला मृतदेह
जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात ललित वाणी हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रविवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्यावर त्यांची हत्या करण्यात आली. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला.

एमआयडीसी पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली. मयत ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमानी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे घटनास्थळी पोहोचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहेत. दरम्यान, हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी मृतदेह उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला आहे. घरातील कर्ता पुरुष केल्याने वाणी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.