पाचोर्यातील ऑईल मिलमध्ये पडलेल्या दरोड्याची उकल : दोघे जाळ्यात
मुद्देमाल जप्त : पाचोरा पोलिसांची कामगिरी
जळगाव : पाचोर्यातील बाजोरा ऑईल मिलमधील दरोड्याची उकल करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले असून दोघांना अटक करण्यात आली.
हात-पाय बांधून झाली होती जबरी चोरी
दरोड्याप्रकरणी आशिष जगदीश बाजोरिया (48, रा.हिंद ऑइल मिल, देशमुखवाडी, पाचोरा) यांनी ि23 जुलै 2023 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास फिर्याद दिली होती. त्यानुसार 23 जुलै 2023 रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मोंढाळा रोडवरील बाजोरिया ऑइल रिफायनरी या ऑइल मिलमध्ये दरोडा पडला होता. सुरक्षारक्षक प्रभाकर रामदास पाटील (61, रा. सारोळा ता. पाचोरा) यांना अज्ञात चोरट्यांनी हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवला होता. त्यानंतर 4 लाख 5 हजार रुपयांची रोकड, 5 हजार रुपये किमतीची गोदरेज कंपनीची तिजोरी, डीव्हीआर मशीन, मोबाईल आदी चार लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पाचोरा पोलीस स्टेशन तपास करीत होते.

गोपनीय माहितीवरून कारवाई
हवालदार राहुल शिंपी, योगेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली. संशयित आरोपी हे फिर्यादीचे घरी आले आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी कसून तपास करत संशयित आरोपी अल्ताफ मसुद खान (31, रा.नुराणी नगर, जारगाव, ता. पाचोरा) व सरफराज हसन शहा फकीर (वय 22 रा. मुल्लावाडा, पाचोरा) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांच्या साथीदार मुक्तार उर्फ धड्या मेहबूब शेख (रा. नुरानी नगर, जारगाव ता. पाचोरा) हा पसारआहे. सदर संशयित आरोपींकडून पिस्टल सारखे दिसणारे लायटर, 50 हजारांची रोकड व चाकू हा जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे, योगेश पाटील आदींनी केली.
