पारोळ्यात दोन पिस्टल व काडतूसासह आरोपी जाळ्यात
पारोळा : पारोळा पोलिसांनी गोपनीय माहितीवरून गावठी बनावटीचे दोन पिस्ट व दोन जिवंत काडतूस नेणार्या स्थानिक दोन आरोपींना अटक केली आहे. पिस्टल, काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघांविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पारोळा शहरातील धरणगाव बायपासजवळ दोन जण दुचाकीवरून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पारोळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवार, 22 जून रोजी रात्री 11 वाजता सापळा रचून दुचाकी अडविली. यावेळी संशयित आरोपी शामकांत एकनाथ पाटील आणि भिकन तुकाराम पाटील (दोन्ही रा.पारोळा) यांच्याकडे गावठी बनावटीचे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतूस आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आाल. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

