नशिराबादनजीक वकिलाच्या गळ्यातील लाखाची सोन्याची चैन लांबवली
नशिराबाद : वकिलाच्या गळ्यातील एक लाख 10 हजारांची सोन्याची चैन अज्ञात व्यक्तीने बळजबरीने हिसकावून लांबवली. ही घटना शुक्रवार, 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली. याप्रकरणी शनिवार, 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता नशिराबाद पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
प्रकाश रामदास मोझे-पाटील (63) हे आपल्या कुटुंबाहसह भुसावळातील शिवकॉलनी परिसरात वास्तव्याला आहे. वकीली करून ते आपला उदरनिर्वाह करतात. नशिराबाद ते भुसावळ रोडवरील मेरीमाता चर्च जवळील रोडने ते जात असतांना अज्ञात व्यक्ती हा त्यांच्याजवळ आला व त्याने प्रकाश मोझे पाटील यांच्या गळ्यातील एक लाख 10 हजार रुपये किंमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून पळ काढला. हा प्रकार शुक्रवार, 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडला. त्यानंतर प्रकाश मोझे पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवार, 6 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड करीत आहे.

