कन्नड तालुक्यातील तरुणाला गावठी पिस्टलासह अटक : चाळीसगावात कारवाई
चाळीसगाव : गस्तीवरील पोलिसांनी चाळीसगाव बसस्थानकातून कन्नड तालुक्यातील तरुणाला गावठी पिस्टलासह अटक केली. संशयीताकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश तुकाराम पवार (25, रा. बोरमाळी, पो.नागद, ता.कन्नड, जि.छत्रपती संभाजी नगर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
संशयावरून पोलिसांची कारवाई
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार 11 जुलै रोजी रात्री 11 ते 12 जुलेै रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरात पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, हवालदार राहुल सोनवणे, हवालदार नितीश पाटील, महेंद्र पाटील, समाधान पाटील, अमोल पाटील, आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रवींद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण हे पेट्रोलिंग करीत असताना समाधान पाटील व अमोल पाटील यांना चाळीसगाव बसस्थानक आवारातील नियंत्रण कक्षासमोर तरुण संशयास्पद हालचाली करीत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले व झडतीअंती त्याच्याकडे गावठी कट्टा आढळल्याने संशयीताला पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

चाळीसगाव पोलिसात गुन्हा
संशयीताचे विचारपूस केल्यानंतर त्याने नाव गणेश तुकाराम पवार (25, रा. बोरमाळी, पो.नागद, ता.कन्नड, जि.छत्रपती संभाजी नगर) सांगितले. पिस्टल बाळगल्याप्रकरणी समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार माळी करीत आहे.
