गावठी पिस्टलासह संशयीत जाळ्यात : जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी
जामनेर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर शहरातून विनापरवाना गावठी पिस्टलजवळ बाळगणार्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. निलेश प्रल्हाद मोरे (23, रा.दामले प्लॉट, जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये शुक्रवार, 12 जुलै रोजी रात्री आठ वाजता जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रणजीत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना परिसरात संशयीत आरोपी निलेश मोरे हातात गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती दिली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी निलेश प्रल्हाद मोरे (23, दामले प्लॉट परिसर, जामनेर) याला अटक केली. संशयीताकडून गावठी बनावटीचा पिस्टल जप्त करण्यात आले. आरोपीला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे.

