शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने चाळीसगावातील सेवानिवृत्ताला 59 लाखांचा गंडा
चाळीसागव : शेअर बाजारात ट्रेडिंग करून गुंतवणूक केल्यास अधिक नफा देण्यात येइेल, असे भासवून चाळीसगावातील वयोवृद्धाला तब्बल 59 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
चाळीसगाव शहरातील 59 वर्षीय वयोवृद्ध परिवारासह वास्तव्याला आहे. ते महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले असून 15 जानेवारी रोजी कॅथरिन मॅकवेल नावाच्या संस्थेच्या माध्यमातून शेअर ट्रेंडींगचे आमिष दाखवत त्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपला जॉईन करून घेण्यात आले. त्यांना एक लिंक पाठवून गुंतवणूक केल्यास त्यांना अधिकचा नफा होणार असल्याचे अमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी 15 जानेवारी ते दि. 19 मार्च दरम्यान वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 58 लाख 95 हजार 351 रुपये भरले. रक्कम भरल्यानंतरही नफा मिळत नसल्याने व मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याची त्यांची खात्री झाली. अखेर त्यांनी सायबर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून गुरूवारी 18 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

