चोपडा तालुक्यात एकाचवेळी तीन बालकांचा मृत्यू : एकाची प्रकृती गंभीर
मृत्यूचे कारण गुलदस्त्यात : सात जणांवर अडावदला उपचार
Three children died at the same time in Chopra taluka : One is in critical condition चोपडा : चोपडा तालुक्यातील कमळगाव शेत शिवारात एकाच कुटुंबातील तीन बालकांचा मृत्यू झाला तर आणखी एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला जळगाव येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेत अजून सात जणांवर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या तिघांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तर मृत्यूचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू
कमळगाव शिवारात लिलेश गोविंदा केंगे यांच्या शेतात सीताराम बारेला हे कुटुंबासह राहतात. गुरुवार, 18 जुलै रोजी रात्री सीताराम बारेला यांची मुले अंजली बारेला, रोहित बारेला यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांचा परस्पर दफनविधी करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मुलगा बादल बारेला हाही अत्यवस्थ झाल्याने त्याला दवाखान्यात आणत असताना त्याचाही मृत्यू झाला. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात बादलचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर सीताराम बारेला यांची अवघ्या पाच महिन्याची बालिका आरती बारेला हिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या चौघा बालकांचे वय चार ते आठ वर्षांचे असल्याने ही घटना नेमकी कशामुळे झाली हे समजू शकले नाही. या घटनेत उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखीने त्रस्त आणखी आले.

सात जणांवर अडावदला उपचार
मुकेश गणेश बारेला (8), सोनाली गणेश बारेला (10), शिला गणेश बारेला (30), दीपाली गणेश बारेला (10), सुनीता गणेश बारेला (सर्व रा. कमळगाव, ता. चोपडा, 17), रेखा मुकेश बारेला (35), मुकेश लक्षण बारेला (48) (दोन्ही रा.उनपदेव, ता.चोपडा) यांच्यावर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील, डॉ. कोमल गावंडे, कविता पाडवी, बबिता वळवी, छोटी बावस्कर, निवेदिता शुक्ल, शोभा चौधरी यांच्याकडून बाधितांवर शर्तीचे उपचार सुरू आहेत. बादल सीताराम बारेला याचे शुक्रवार 19 रोजी दुपारी शवविच्छेन करण्यात आले.
अहवाल येईपर्यंत मृत्यूचे कारण सांगणे कठीण
शवविच्छेदनाचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोवर घटना कशामुळे घडली याचा उलगडा होणार नाही. परंतु, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही, परंतु उपचारासाठी दाखल झालेल्यांची आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत.
