जळगाव जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन निघणार !

भाजपाचे अनिल बोरनारे यांनी केली शिक्षण उपसंचालकांशी चर्चा


निंभोरा : जळगाव जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे पगार काढण्यात येऊ नये असा फतवा शिक्षणाधिकारी कार्यालयाने काढल्याने शेकडो शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिक्षक नेते व भाजपाचे प्रदेश निमंत्रित कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालक व पे युनिट अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर या पत्राला स्थगिती देण्यात आली. सुधारित पत्र काढून अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आदेश निघणार असल्याने जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पत्रामुळे वाढला शिक्षकांचा मनस्ताप
जळगाव जिल्हा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाने शुक्रवार, 12 जुलै रोजी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना आदेश निर्गमित करीत जुलै महिन्याचे वेतन देयक संच मान्यतेमध्ये मंजूर पदांनुसार काढण्यात यावे, अतिरिक्त शिक्षकांचे व समायोजन न झालेल्या शिक्षकांचे वेतन काढण्यात येऊ नये असे शाळांना आदेश दिले या आदेशामुळे जिल्ह्यातील शेकडो शिक्षक हवालदिल झाले. अनेक शिक्षकांनी भाजपाचे प्रदेश निमंत्रित सदस्य व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे कैफियत मांडली. अनिल बोरनारे यांनी लागलीच शिक्षण उपसंचालक व पे युनिट अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून तातडीने हे नियमबाह्य आदेश रद्द करण्याची मागणी केली त्यावर अधिकार्‍यांनी लवकरच आदेश मागे घेत सुधारित आदेश काढून अतिरिक्त शिक्षकांचे वेतन काढण्यात येईल असे स्पष्ट केले.

अनिल बोरनारे यांनी मांडलेले मुद्दे
शाळेतील अतिरिक्त शिक्षकाला सेवा संरक्षण असते, अतिरिक्त शिक्षकांचे वेतन दुसर्‍या शाळेत समायोजन होईपर्यंत मूळ शाळेतूनच निघते, कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबविण्यात येऊ नये, असे शासनाने वारंवार आदेश दिल्यावर सुद्धा राज्यातील अनेक जिल्ह्यात असे नियमबाह्य आदेश काढण्यात येतात. अशा अधिकार्‍यांची तक्रार शिक्षणमंत्र्यांकडे करणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !