संतापजनक !: नशिराबादला पोषण आहार पाकिटात निघाला मेलेला उंदीर !
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पोषण आहारासंदर्भात नेहमीच तक्रारींचा समोर येतो. त्यातच नशिराबाद येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गर्भवती महिलांना व बालकांना अंगणवाडी शाळामधून वितरित होणार्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेला उंदिर आढळल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोषण आहारातील अनागोंदी पुन्हा समोर
जळगावातील नशिराबाद येथे अंगणवाडीतून पोषण आहाराच्या पाकिटात एक मेलेल्या उंदराचे पिल्लू सापडलेले आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यातील मिक्स तांदळाच्या पाकिटात हे पिल्लू आढळले आहे.

गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. यामुळे प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला. हा पोषण आहार आहे की बालकांच्या जीवाशी केलेला खेळ ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे वेळ मारून नेली जाईल? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
