फैजपुरात शॉर्ट सर्किटने संसाराची राखरांगोळी


पालिकेचा अग्निशमन विभाग निष्क्रिय : एक तासाने यंत्रणा झाली दाखल : मुस्लिम तरुणाचा आग विझवण्यासाठी पुढाकार

फैजपूर : फैजपूर शहरातील रथगल्ली भागात राहणार्‍या व हात मजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या जैन कुटुंबाच्या घराला शुक्रवारह पहाटे सहा वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या आगीत कुटुंबाचा संपूर्ण संसार बेचिराख झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन केंद्राला कळवूनसुद्धा पाऊणतास अग्नीशमन बंब उशिरा आल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चार अग्निशमन केंद्रावरील कर्मचार्‍यांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.

शॉर्टसर्किटनंतर क्षणात पेटले घर
रथ गल्लीमधील रीक्षा चालक किरण लिलाधर जैन तसेच त्यांचे नातेवाईक सुपडू जैन, पुष्पाबाई जैन व याकुब खान यांच्या जुन्या घराला शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीने थोड्याच वेळात रुद्ररूप धारण केले आगीची माहिती देण्यासाठी अग्निशमन केंद्र पालिका कार्यालय या ठिकाणी अनेकांनी फोन लावले पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने काहींनी मात्र हाकेच्या अंतरावर असलेले अग्निशमन केंद्र गाठले त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते. तब्बल पाऊण तासानंतर अग्निशमन बंब दाखल झाला तोही अपूर्ण भरलेल्या स्थितीत त्यामुळे नागरीकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

तीन तासांनी आगीवर नियंत्रण
पालिकेच्या दोन व सावदा पालिकेच्या अग्निशमन बंब यांनी तब्बल दोन ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले या आगीत किरण जैन व त्यांचे नातेवाईक यांचे संसारोपयोगी वस्तू तसेच विक्रीसाठी असलेले व होळीच्या यात्रेनिमित्त विक्रीसाठी आणलेले कपडे, सामान तसेच रोख रक्कम टीव्ही, फ्रिज, शासकीय कागदपत्रे, धान्य, रोज वापरासाठी लागणारे कपडे संपूर्ण जळून खाक झाले तर त्यात घरातील भाडेकरू दीपक भावसार व शेजारील या याकुब खान यांच्या घरातील मुलीच्या लग्नाचे कपडे व साहित्य सुद्धा जळाले त्यात त्यांचे एक लाखाच्या जवळपास नुकसान झालेले आहे तर जैन कुटुंबाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्याचा अंदाज काढणेही कठीण असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.

आगीनंतर प्रशासकीय अधिकार्‍यांची धाव
आगीची माहिती मिळताच प्रांताधिकारी अजित थोरबोले तहसीलदार जितेंद्रकुवर, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, मंडळाधिकारी बंगाळे, यांनी घटनास्थळी भेट दिली तर तलाठी प्रशांत जावळे यांनी पंचनामा केला माजी आमदार हरिभाऊ जावळे, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, पि के चौधरी, नीलेश राणे, नगरसेवक हेमराज चौधरी, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, यांनीही भेटी दिल्या. फैजपूर पोलिसात आगीची नोंद घेण्यात आली आहे

आग विझविण्यासाठी मुस्लिम तरुणांचा पुढाकार
आगीची माहिती मिळताच गल्लीतील तसेच परीसरातील तरुण मंडळींसोबत मुस्लिम तरुणांनी ही आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला तसेच नगरसेवक कलीम मन्यार, केतन किरंगे, रईस मोमीन, यांच्यासह परिसरातील नागरिक आग विजवण्यासाठी सहकार्य करत होते.

कर्तव्यात कसूर : अग्निशमन केंद्रावरील कर्मचार्‍यांना नोटिसा
घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर असलेले अग्निशमन केंद्रावर फोन लावून सुद्धा कर्मचारी फोन उचलत नव्हते तर स्वतः गेल्यावर तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी फायरमन रुबाब तडवी तसेच त्यांचे सहकारी जुबेर खान, चंपालाल आदिवाल व संवेदनशील वक्तव्य करणारा अग्निशमन केंद्रावरील कर्मचारी हेमंत फेगडे या चार कर्मचार्‍यांना पालिकेतर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली

पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलासाठी प्रयत्न
आगीत पूर्णपणे बेचिराख झालेल्या जैन कुटुंबाच्या निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी तातडीने पंतप्रधान आवास योजनेतून त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जागेचे मोजमाप करण्यात आले व या परीवाराला हक्काचा निवारा मिळावा यासाठी या घरकुलाला प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचेही पालिका सूत्रांनी सांगितले.

मदतीचे आवाहन
आगग्रस्त जैन कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी सायंकाळी शहरातून मदत फेरी काढण्यात आली. मदत फेरीत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज, प्रवीण महाराज, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, नगरसेवक शेख कुर्बान, देवा साळी, निलेश राणे, पी.के.चौधरी, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, चंद्रशेखर चौधरी, काँग्रेस अध्यक्ष शेख रीयाज, भाजप शहराध्यक्ष अनंत नेहते, राकेश जैन, भुपेंद्र सोनवणे, संदीप भारंबे, दीपक होले, संजय रल, दीपक सोनवणे यासह गावातील तरुण वर्ग उपस्थित होता.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !