भुसावळ विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात अनुपकुमार मनुरे महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार !
भुसावळ (11 ऑक्टोबर 2024) : भुसावळ विधानसभेचा आखाडा निवडणुकीपूर्वीच तापला असून इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. सर्वाधिक इच्छूक महाविकास आघाडीतील असून त्यात भुसावळातील उच्चशिक्षीत अनुपकुमार मनुरे या तरुण उमेदवाराचाही समावेश आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात अलीकडेच उमेदवार निवडीसाठी मुलाखती झाल्या. त्यात भुसावळातील दहा इच्छुकांनी आपापले आडाखे मांडत उमेदवारी मागितली. त्यात प्रबळ दावेदारांमध्ये अनुपकुमार मनुरे यांच्या नावाचाही समावेश आहे.
पुण्यात झाल्या इच्छूकांची मुलाखती
महाराष्ट्र विधानसभेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भुसावळ (अनुसूचित जाती राखीव) या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नुकत्याच पुण्यात निसर्ग मंगल कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. प्रसंगी भुसावळातून दहा इच्छूक उमेदवारांनी शरदचंद्र पवार, माजी मंत्री फौजिया खान आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांसमोर मुलाखती दिल्या.
या उमेदवारांनी दिल्या मुलाखती
या मुलाखतीमध्ये शहरातील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अनुपकुमार प्रेमचंद मनुरे,
डॉ.राजेश मानवतकर, प्रीती तोरण महाजन, प्रा.डॉ.जतीन मेढे, दिनेश भोळे, प्रा.एम.आर.संदानशीव, संगीता भामरे, माजी नगरसेवक जगन सोनवणे, नंदा सपकाळे आदी दहा उमेदवारांनी मुलाखती देत पक्षाकडून उमेदवारी मागितली.
याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी यांच्यासोबत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष मालकर, अल्पसंख्यांक विभागाचे जळगावचे महानगरचे अध्यक्ष एजाज गफ्फार मलिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनुरे यांची भुसावळशी नाळ : नाथाभाऊंचे घेतले आशीर्वाद
अनुपकुमार मनुरे हे व्यवसायाने बिल्डर असून त्यांनी जळगाव जिल्ह्यासह गुजरातच्या वडोदरा, गांधीधाम, अंजर आदी भागात विविधांगी कामे केली आहेत. त्यात घरकुल व पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा समावेश आहे. भुसावळातील चिंतामणी विहारस्थित मनुरे हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांचे वडिल भुसावळ पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात शाखा अभियंता व नंतर सहा.अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात मनुरे यांनी विविध मंडळांना भेटी दिल्याा तसेच दुर्गोत्सवातही त्यांनी मंडळांना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांच्याहस्ते आरतीही करण्यात आली. प्रसंगी कृउबाचे माजी सभापती सचिन चौधरी उपस्थित होते. निवडणुकीच्या दृष्टीने मनुरे यांनी नुकतीच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत.