दीपनगराजवळील अपघाताच्या चौकशीत सापडल्या 56 हजारांच्या बनावटी चलनी नोटा


भुसावळ (20 डिसेंबर 2024) : भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील निर्मल ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीत बनावट नोटा आढळून आल्याच्या प्रकार मंगळवार, १७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता नाशिक येथील तीन जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा

भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील निर्मल ढाब्याजवळ मंगळवार, १७ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हिरामण कारभारी धात्रक (४६, रा.नाशिक) यांचा मृत्यू झाला तर सोबत असलेले नरेंद्र दत्ता मुळे (५४) आणि विजय देवराम काळे (३२, दोन्ही राहणार नाशिक) हे जखमी झाले होते. अपघातस्थळी भुसावळ तालुका पोलिसांनी भेट देवून चौकशी केली होती. दरम्यान, जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यासोबत वाहनातील सर्व वस्तू  रुग्णालयात आणण्यात आल्या होत्या. जवळपास दोन लाख तीस हजारांची रोकड जखमी व मयतासोबत सोबत होती मात्र या रकमेत 100, 500 रुपये दराच्या बनावट नोटा आढळल्याने डॉक्टरांनी भुसावळ तालुका पोलिसांना माहिती दिली. यावेळी ५६ हजार २०० रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. जखमी बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने पोलिसांनी बनावट नोटा, ८ मोबाईल जप्त केले आहेत.पोलीस कॉन्स्टेबल योगेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत हिरामण कारभारी धात्रक (46), जखमी नरेंद्र दत्ता मुळे (54), विजय देवराम काळे (32, सर्व राहणार नाशिक) यांच्या विरोधात गुरूवार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे हे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !