यावलनजीक भीषण अपघात : दुचाकीचे टायर फुटल्याने पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर
Related Fatal Accident: Husband dies and wife critically due to tire burst of two-wheeler यावल (19 ऑक्टोबर 2024) : यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेरील पेट्रोल पंपाजवळ भुसावळ कडून यावलकडे येत असतांना दुचाकीच्या टायर फुटले आणि यात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडला. अपघाताची माहिती मिळताच आमदार शिरीष चौधरी ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली व मयताचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. मयत हे शिरसाड येथील असून अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली.
मयत शिरसाडचा रहिवासी
यावल-भुसावळ रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भुसावळकडून यावलकडे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 एन.2433) द्वारे जगदीश वासुदेव अत्तरदे (53) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (45) हे येत असताना पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर फुटले आणि भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. हा अपघात प्रचंड भीषण होता. या अपघातात अत्तरदे यांचे डोके झाडावर आदळले गेल्याने जबर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी ही गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर आमदारांची धाव
अपघाताची माहिती मिळताच शहरात असलेले आमदार शिरिीष चौधरी, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, सांगवी खुर्दचे माजी सरपंच विकास पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांना माहिती देण्यात आली. ट्रॅफिकचे पोलीस हवालदार अर्षद गवळी, सहायक फौजदार असलम खान यांनी जखमी महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. मृतदेह विकास पाटील यांच्या वाहनातून यावल रुग्णालयात आणण्यात आला. अपघाताची माहिती साकळी व शिरसाड गावात मिळताच यावल ग्रामीण रुग्णालयात साकळीचे सरपंच दीपक पाटील, शिरसाड येथील ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, माजी सदस्य गोटू साळुंकेसह साकळी व शिरसाड गावातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली.
महिलेला जळगावर हलवले
अपघातात गंभीर जखमी असलेल्या हेमलता अत्तरदे या बेशुद्धच असून त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती देखील गंभीर आहे.
