रेल्वेत दागिण्यांची चोरी : आरोपीला एक वर्ष शिक्षा ; भुसावळ रेल्वे न्यायालयाचा निकाल
Theft of jewelery in train : Accused sentenced to one year ; Judgment of Bhusawal Railway Court भुसावळ (26 ऑक्टोबर 2024) : प्रवासी झोपल्याची संधी साधून भामट्याने महिलेच्या दागिण्यांची चोरी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. भुसावळ रेल्वे न्यायालयात नऊ वर्ष खटल्याचे कामकाज चालल्यानंतर आरोपी शरद विश्वासराव तायडे (रा.अमरावती) यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
असे आहे चोरी प्रकरण
6 जानेवारी 2015 रोजी तक्रारदार कादर शेख हे त्यांच्या पत्नीसह राजेंद्रनगर एक्स्प्रेसने कल्याण-रावेर असा प्रवास करीत असताना भुसावळ जंक्शनवरून गाडी सुटल्यावर आरोपी शरद तायडे (रा.अमरावती) याने कादर शेख यांच्या झोपेचा फायदा घेत त्यांची बॅग चोरली. बॅगेत सोन्याचे दागीने व अन्य साहित्य असा 78 हजारांचा ऐवज होता. लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर भुसावळ रेल्वे न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

पाच साक्षीदार तपासले
न्यायाधीश व्ही.बी.सांळुके यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. सरकारी अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांनी पाच साक्षीदार तपासले. फिर्यादी कादर शेख, हवालदार नितीन पाटील, हवालदार प्रमोद जंजाळकर, प्रमोदकुमार चिकलमुंडे व पीएसआय शब्बीर शेख यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील खरे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सांळुके यांनी आरोपी शरद तायडे यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, पैरवी अधिकारी गणेश शिरसाठ यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, तब्बल नऊ वर्ष खटल्याचे कामकाज चालल्याची रेल्वे न्यायालयात ही पहिलीच घटना आहे.
