वड्री धरण परिसरात बिबट्याच्या बछड्याच्या हल्ल्यात बालक जखमी
Child injured in attack by leopard calf in Vadri Dam area यावल (27 ऑक्टोबर 2024) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री गावाजवळील वड्री धरण परिसरात मनमादेवी मंदिराजवळ सांडव्याच्या पाण्यात बिबटचे काही बछडे पाणी पिण्यासाठी आल्यानंतर त्यांनी 12 वर्षीय बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात बालकाला किरकोळ दुखापत झाली. हा प्रकार इतर नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिथे धाव घेतली. बिबट आणि त्याचे बछडे गर्दी पाहून पळाले. या बालकाला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानतर प्रथमोपचार करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र वड्रीसह परिसरात काही बछड्यांसह बिबटचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाने घ्यावी दखल
वनविभागाने या बिबट आणि त्याच्या बछड्यांना अभयारण्यात सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वड्री येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी वड्री धरण आहे. या धरणाजवळ मनमादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ शनिवारी दुपारी विनोद रुपसिंग बारेला (12) हा बालक सांडव्यातील पाण्याजवळ गेला असता बिबट आणि त्याचे पाच बछडे पाणी पिण्यासाठी आले होते. त्यातील एका बछड्याने या बालकावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. बालकाने तेथून धाव घेतली असता बिबटच्या बछड्याने त्याच्या पाठीवर पंजा मारला व त्यास दुखापत केली. हा प्रकार इतर नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी गर्दी करून तेथे धाव घेतल्यामुळे गर्दीला पाहून बिबट आणि त्याचे बछडे तिथून पळो. दरम्यान, तातडीने या बालकाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.शर्मा, मंजुषा कोळेकर, अतिश खडके यांनी त्याच्यावर प्रथम उपचार केले त्याची प्रकृती स्थिर आहे.

नागरिकांमध्ये पसरली भीती
धरण परिसरात एक बिबट आणि त्याचे पाच बछडे वावर करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी रूपसिंग बारेला यांनी सांगितले. अनेकवेळा सांडव्यात पाणी पिण्यासाठी ते येत असतात. या घटनेत बालक थोडक्यात बचावला आहे. वनविभागाने या बिबट आणि त्याच्या बछड्यांना अभयारण्यात सोडावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
