मोठी बातमी : वरणगाव ऑर्डनन्समधील शस्त्र चोरणारा संशयीत एटीएसच्या जाळ्यात
Big News : Suspected weapon thief from Varangaon Ordnance in ATS net भुसावळ (4 नोव्हेंबर 2024) : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतून सरावासाठी वापरण्यात येणार्या पाच महागड्या रायफल्स चोरी झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. एटीएसकडून या गुन्ह्याच्या तपासादरम्यान भुसावळ तालुक्यातील एका संशयीताला अटक करण्यात आली आहे तर अन्य दोन संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीकडून उर्वरीत दोन रायफल्स जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकाचवेळी पाच शस्त्रांची चोरी
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील शस्त्रागारातून 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलूप व कडी कोयंडा तोडुन शस्त्रागारातील ए.के.47- 3 व गलील 5.56 या दोन रायफल्स लांबवल्या होत्या. वरणगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

एटीएसकडून समांतर तपास
गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अति महत्वाचा असल्याने महाराष्ट्र राज्याचे ए.टी.एस.प्रमुख, ए.टी.एस.चे आय.जी. व पोलीस अधीक्षक यांनी ए.टी.एस. नाशिक युनिटचे प्रभारी अधिकारी व जळगांव कॅम्पचे ए.टी.एस.पथक तसेच ए.टी.एस.चा तांत्रीक विभाग यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. ए.टी.एस.पथक हे 23 ऑक्टोबरपासून वरणगावात ठाण मांडून होते व गुन्ह्याची बारकाईने व कसोशीने चौकशी करीत होते.
रेल्वे रूळावर फेकल्या रायफल्स
यंत्रणेकडून तपास सुरू असताना तीन चोरी झालेल्या रायफल्स जाडगावजवळील रेल्वे रूळावर बेवारस आढळल्या होत्या व गस्तीवरील रेल्वे कर्मचार्यामुळे ही बाब समोर आली होती मात्र एके 47 व अन्य एक गलील रायफल्सचा शोध सुरू होता. एटीएसने गोपनीय माहितीच्या आधारे एका आरोपीला अटक केली असून गुन्ह्यातील दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून अन्य दोन संशयीतांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
