सुनसगावजवळील फॅक्टरीत स्फोट : सुरक्षेच्या नियमांना बगल दिल्यानेच दोघा कामगारांचा मृत्यू
भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद : पोलिसांकडून फॅक्टरीला सील ; सखोल चौकशीनंतर होणार कारवाई
भुसावळ : ऑईलने भरलेल्या मात्र लिकेज होत असलेल्या टाकीला वेल्डींग करताना आग लागल्यानंतर स्फोट होवून जागीच दोन कामगारांचा मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय-सुनसगाव रस्त्यावरील गट क्रमांक 684 मध्ये ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ज्वलनशील ऑईल भरलेल्या टाकीला मजुरांकडून वेल्डींग होत असल्याचा प्रकार उघड झाला असून सुरक्षेच्या नियमांना या कंपनीत तिलांजली दिली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या दुर्दैवी घटनेतकाशीनाथ फत्तू सुरवाडे (40, रा.खेडी रोड, जळगाव, मुळ रा.हतनूर, ता.भुसावळ) व खेमसिंग हेमराज पटेल (26, रा.बेमतेरा, छत्तीसगड) यांचा जागीच मृत्यू झाला तर टुनटुनकुमार (मूळ रा.बिहार, ह.मु.दिया कॉपर कंपनी) हे जखमी झाले.
स्फोटानंतर जागीच झाला दोघांचा मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार बेलव्हाय शिवारात सहा महिन्यांपूर्वीच कॉपर मास्टर अलाईस अॅण्ड कंपनी सुरू करण्यात आली होती. जळगाव कमलाकर रामकृष्ण माळी यांच्या मालकिची ही कंपनी असून त्यात रॉ कॉपरपासून कॉपर प्लेटस् तयार केल्या जातात. कंपनीबाहेरच असलेल्या मोकळ्या जागेत चौरस आकाराच्या लोखंडी टाकीत फर्निश केमिकल ऑईल भरलेले होते मात्र ही टॉकी गळत (लिकेज) असल्याने तीन कामगारांकडून तिला वेल्डींग केले जात असताना अचानक गॅस तयार होवून टाकीचा स्फोट झाला. त्यात दोन्ही कामगार जागीच मयत झाले तर तिसरा कामगार जखमी झाला. पोलिसांनी टाकीत मरण पावलेल्या खेमसिंग याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने ऑईलच्या टाकीतून बाहेर काढला. तर टाकीच्या बाहेर मृत पडलेले काशीनाथ सुरवाडे यांचा मृतदेह हा नागरीकांच्या सहाय्याने उचलून जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पीटलमध्ये विच्छेदनासाठी हलवला.
कंपनीत पसरले ऑईल
कामगारांनी कंपनीच्या गोदामात वेल्डींग मशीन ठेवले पत्र्यातून त्याची वायर बाहेर नेत वेल्डींग सुरू केले हाते. लोखंडी टाकीवर बसून खेमसिंग पटेल हे वेल्डींग करीत होते तर काशीनाथ सुरवाडे हे टाकीच्या खाली उभे राहून वेल्डींग करीत होते. टाकीला वेल्डींग करीत असतांनाच ऑइलने भरलेल्या टाकीचा स्फोट झाला. यामुळे टाकीचा वरचा पत्रा फाटल्याने ऑईल बाहेर फेकले गेले तर वर वेल्डींग करीत असलेले पटेल हे ऑईलच्या टाकीच्या आतमध्ये पडून जागीच मरण पावले तर बाहेर उडालेल्या आईलमुळे सुरवाडे सुध्दा जागेवरच गरम ऑईलने भाजून होरपळून मरण पावले. कंपनीच्या गोदामातही सर्वदूर ऑईल पसरलेले दिसून आले. कंपनीचे मालक कमलाकर माळी (रा.आडगाव, ता.चोपडा) यांनी धाव घेतल्यानंतर त्यांनादेखील या घटनेने मोठा मानसिक आघात बसला. दरम्यान, स्फोटानंतर कंपनीला आग लागल्यानंतर भुसावळ येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
अधिकार्यांसह कर्मचार्यांची धाव
बेलव्हाय शिवारात झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे आणि त्यांच्या सहकार्यांनी धाव घेतली. घटनास्थळी तहसीलदार दीपक धीवरे, आमदार संजय सावकारे यांनी भेट देऊन पाहणी केली. वीज कंपनीच्या अधिकार्यांनी पाहणी केली तसेच प्रकार जाणून घेतला. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करीत ऑईल व अन्य साहित्य जप्त केले. पंचमाना करून त्यांनी कंपनीला कुलूप ठोकले.




