30 हजारांची लाच भोवली : भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपनिरीक्षक पसार तर खाजगी पंटर मात्र जाळ्यात
ट्रॅपची कुणकुण लागताच उपनिरीक्षक अंडरग्राऊंड : फैजपूरात खाजगी पंटराला पडल्या बेड्या
भुसावळ (22 नोव्हेंबर 2024) : अवैधरित्या विक्री होणार्या दारूची केस न करण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याप्रकरणी भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक किरण सोनवणे (सध्या रा.भुसावळ) व खाजगी पंटर किरण माधव सूर्यवंशी (37, हुडको कॉलनी भुसावळ) यांच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, लाचेचा संशय येताच उपनिरीक्षक सोनवणे पसार झाला असून खाजगी पंटराला मात्र अटक करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
जळगाव जिल्ह्यातील 35 वर्षीय तक्रारदार यांच्याकडे 19 रोजी उपनिरीक्षक रिकण सोनवणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने छापा टाकत 30 ते 35 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या. दारूची केस न करण्यासाठी 10 हजार रुपये घेण्यात आले व त्यानंतरही दारूची केस न करण्यासाठी तक्रारदाराकडून 50 हजारांची मागणी करण्यात आली. 22 राोजी तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम 50 हजारांची मागणी करीत 30 हजार स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता फैजपूर येथे खाजगी पंटर किरण सूर्यवंशी यास अटक करण्यात आली मात्र ट्रॅपची कुणकुण सोनवणे यांना लागताच ते पसार झाले.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, नाईक बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
