महायुतीत सीएमपदी कुणाची लागणार वर्णी ? हालचालींना प्रचंड वेग
मुंबई (24 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळाल्यानंतर राज्याच्या सीएमपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे आता राज्याचे नजरा लागल्या आहेत. निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीने 230 जागा जिंकल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.
भाजपाचा पहिला मुख्यमंत्री पदाचा दावा
मुख्यमंत्री पदावरुन महायुतीतही धुसफूस असल्याचे पाहायला मिळत होते. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यातच भाजपचे 132 आमदार निवडून आल्याने भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला तर दुसरीकडे पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती आहे.

महायुतीच्या गोटातील हालचालींना वेग
सध्या महायुतीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून दोन निरीक्षक पाठवले जाणार आहेत. केंद्रीय भाजपकडून 2 निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत. विधीमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही मोठ्या हालचाली घडत आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे.
नवा मुख्यमंत्री कोण होणार?
महायुतीच्या तिन्हीही पक्षांचे नेते दिल्लीत जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर भाजपचे दिल्लीतील नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.




