भुसावळातील ‘राज्य उत्पादन’ च्या पसार लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात सापडले 41 लाखांचे घबाड

जळगाव एसीबीच्या कारवाईने खळबळ : उपनिरीक्षक एसीबीच्या हाती लागेना


A hoard of Rs 41 lakhs was found in the house of a corrupt sub-inspector in Bhusawal, spreading ‘state production’ भुसावळ (1 डिसेंबर 2024) : अवैधरित्या विक्री होणार्‍या दारूची केस न करण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याप्रकरणी भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक किरण सोनवणे (सध्या रा.भुसावळ) व खाजगी पंटर किरण माधव सूर्यवंशी (37, हुडको कॉलनी भुसावळ) यांच्याविरोधात फैजपूर पोलिसात शुक्रवारी कारवाई केल्यानंतर शनिवार, 23 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. खाजगी पंटर सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली तर सोनवणे मात्र ट्रॅपची कुणकुण लागताच पसार झाले होते. ते हाती येत नसल्याने एसीबीने घर झडतीची परवानगी भुसावळ न्यायालयाकडून घेत शुक्रवार, 29 रोजी संशयीताच्या शांती नगराजवळील विमलपाटील नगरातील घराची झडती घेतली. यावेळी रोकड, सोन्या-चांदीसह तब्बल 41 लाखांचे घबाड एसीबीच्या हाती लागले.

असे आहे लाच प्रकरण
जळगाव जिल्ह्यातील 35 वर्षीय तक्रारदार यांच्याकडे मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक किरण सोनवणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकत 30 ते 35 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. दारूची केस न करण्यासाठी 10 हजार रुपये घेण्यात आले व त्यानंतरही दारूची केस न करण्यासाठी तक्रारदाराकडून 50 हजारांची मागणी करण्यात आली. शुक्रवार, 22 रोजी तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम 50 हजारांची मागणी करीत 30 हजार स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता फैजपूर येथे खाजगी पंटर किरण सूर्यवंशी यास अटक करण्यात आली मात्र ट्रॅपची कुणकुण सोनवणे यांना लागताच ते पसार झाले.

संशयीताच्या पथकाकडून घराची झडती
एसीबीकडून अटक होण्याच्या भीतीने पसार झालेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक किरण सोनवणे (रा.भुसावळ) हे पसार झाल्यानंतर ते हाती येत नसल्याने जळगाव एसीबीने भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने घर झडती घेण्याचे आदेश मिळवले व दोन पंच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, व्हिडिओग्राफर व सोनवणे राहत असलेल्या घराच्या मूळ मालकाच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपासून घर झडती घेण्यात आली.

41 लाखांचे घबाड जप्त
उपनिरीक्षक सोनवणे यांच्या भाडे तत्वावरील घरातून एक लाख 49 हजार 290 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या बाटल्या, अडीच हजार रुपये 25 लीटर गावठी हातभट्टीची दारु, बुलेट मोटार सायकल, 14 लाख रुपये किंमतीच्या किया सेलटॉस कारचे पेपर्स, दिड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, 9 एम. एम. पिस्टलच्या दहा पुंगळ्या, एक लाख 91 हजारांची रोकड, 17 लाख 90 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदी खरेदीच्या मूळ पावत्या याशिवाय दोन लाख रुपये किंमतीचे टीव्ही, फ्रिज, एसी व इतर वस्तू आणि बँकेचे इतर कागदपत्र मिळून 40 लाख 98 हजार 44 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !