महापरिनिर्वाण दिनानिमित्त 16 विशेष गाड्या धावणार !

मुंबईत 675 विशेष तिकीट तपासणीस : रेल्वे प्रशासनाकडून अनुयायांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था


16 special trains will run on the occasion of Mahaparinirvana Day भुसावळ (5 डिसेंबर 2024) : मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणार्‍या भाविकांची गर्दी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापरिनिर्वाण दिनी शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी राज्य आणि देशातून मोठ्या संख्येने येतात. मध्य रेल्वेने शहरात येणार्‍या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

4 ते 8 डिसेंबरपर्यंत विशेष गाड्या
मध्य रेल्वेतर्फे 4 ते 8 डिसेंबरपर्यंत 16 विशेष मेल, एक्स्प्रेस गाड्या चालवणार आहे. ज्यात नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान 8 सेवा, दादर ते नागपूर दरम्यान 2 सेवा, कलबुर्गी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान दोन सेवा, आदिलाबाद आणि दादर दरम्यान 2 सेवा तसेच अमरावती आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान 2 सेवा यांचा समावेश आहे. मध्य रेल्वे मुंबई विभाग 5 व 6 च्या मध्यरात्री 12 अतिरिक्त उपनगरी गाड्या चालवणार आहे. ज्यात मुख्य मार्गावरील परळ ते कुर्ला, ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या गाड्या आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी, पनवेल दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे.

मुंबईत उघडले चौकशी काउंटर
रेल्वेतर्फे दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांतर्फे दिवसरात्र मदत केद्र सुरू केले आहे. चैत्यभूमी येथे 5 ते 7 डिसेंबर या काळात अनारक्षित तिकीटे आणि रेल्वे गाडीच्या चौकशीसाठी युटीएस सह चौकशी काऊंटर उघडण्यात आले आहे. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे अतिरिक्त यूटीएस काउंटर उघडले आहे.

विविध स्थानकांवर 675 तिकीट तपासणीस
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनातर्फे 675 तिकीट तपासणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्थानकांवर प्रवाशांचे योग्य मार्गदर्शन व्हावे आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर येथे 223, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 166, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 105, ठाणे येथे 103 आणि कल्याण येथे 78 असे एकूण 675 तिकीट तपासणी कर्मचारी तैनात केले आहे.

सुरक्षा यंत्रणा तैनात
मुंबई येणार्‍या अनुनयांच्या गर्दीच्या पार्श्वभुमीवर अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कर्मचारी दोन सत्रात काम करण्यासाठी तैनात केले आहे. दादर येथे 120, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 40 आणि कल्याण येथे 30 कर्मचारी नियमित तैनात आहेत. अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून दादर येथे 250 पेक्षा जास्त, लोहमार्ग पोलिस आणि 80 हून अधिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तैनात केले आहे. आरपीएफ,जीआरपी कर्मचार्‍यांसह विशेष तिकीट तपासणी पथके,कर्मचार्‍यांना आरक्षित डब्यासमोरील स्थानकांवर केवळ बोनाफाइड प्रवाशांच्या प्रवेशाची खात्री करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

गर्दी व्यवस्थापन
दादर येथील मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 8 मधील उपलब्ध जागेजवळ होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. दादर येथील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश योजना तयार केली आहे. दादर येथील गर्दी सुरळीत व्हावी यासाठी मध्य पूल आणि बीएमसी पुलावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी दादर स्थानकावर चैत्यभूमीकडे जाण्याचा मार्ग, राजगृहाकडे जाण्याचा मार्ग आदी 214 बॅनर लावले आहे.

प्रवाशांसाठी सर्वोतोपरी सुविधा
मध्य रेल्वेतर्फे मुंबई, दादर येथे संबंधित ठिकाणी पिण्याचे पाणी, वॉटर कुलर, स्वच्छ स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था, व्हील चेअर, स्ट्रेचर आणि पुरेशा भोजन सुविधा उपलब्ध केल्या आहे. दादर, मुंबई, एलटीटी आणि कल्याण येथे 5 ते 9 डिसेंबरपर्यत वाणिज्य निरीक्षक यांची 24 तास नियुक्ती करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !