संभाव्य मंत्र्यांच्या यादीसह देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत : शिंदेनी जाणे टाळले
वृत्तसंस्था । मुंबई (12 डिसेंबर 2024) : महायुती सरकारचा दोन दिवसांनी मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे असून मंत्र्यांच्या यादीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन दिल्लीत दाखल झाले असलेतरी नाराज एकनाथ शिंदे यांनी मात्र जाणे टाळले असल्याने महायुतीत अद्यापही धुसफूस कायम असल्याच्या चर्चा आहेत.
असे आहे खाते वाटपाचे सूत्र
मंगळवारी रात्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची सुमारे दीड तास बैठक झाली. त्यात खात्यांचे विभाजन, पालकमंत्री, महामंडळ अध्यक्ष आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार भाजपला 20 ते 22, शिंदेसेनेला 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 10 मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. फडणवीसांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही होते. विदर्भातील ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळेंना मंत्रीपद मिळू शकते, असे मानले जात आहे. याच दौर्यात फडणवीसांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फडणवीसांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना दिली. त्यानंतर त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांची रात्री भेट घेऊन मंत्री मंडळ विस्ताराबाबत चर्चा केली.

गृह खात्यावर शिंदे ठाम मात्र मागणी पूर्ण होण्याची कक्यता धूसर
एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीपासून गृह खाते मागितले असून ते देण्यास भाजपा तयार नाही त्यामुळे त्यांना नगरविकास, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची तीन दिवसांपूर्वी ऑफर देण्यात आली मात्र अद्यापही त्यांनी त्यास मंजुरी दिलेली नाही.
आमदार संजय शिरसाट म्हणाले : सेनेला 13 मंत्री पद
13 किंवा 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊन शिवसेनेला 13 मंत्रिपदे मिळणार असल्याचा दावा शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला. एकनाथ शिंदेंची भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच फडणवीसांशी चर्चा झाली असल्याने ते दिल्लीला गेले नाहीत, असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.




