परभणीत बंदला हिंसक वळण : 40 जण ताब्यात ; इंटरनेट सेवा बंद


Bandh turns violent in Parbhani: 40 people detained; Internet services suspended परभणी (12 डिसेंबर 2024) : संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी बंदला बुधवारी दुपारी हिंसक वळण लागल्यानंतर काही दुकानांची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. याप्रकरणी आतापर्यंत 40 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे आय.जी.शहाजी उमप यांनी दिली.

परभणीत संचारबंदी लागू
परभणीमध्ये बुधवारी आंबेडकरी अनुयायांकडून पुकारण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते परंतु या आदेशाला न जुमानता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली.

पुढील आदेशापर्यंत इंटरनेटही बंद
परभणीतील सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी एक वाजेपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

परभणी शहरातील सात ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात येत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !