30 हजारांचे लाच प्रकरण : भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लाचखोर उपनिरीक्षकाचे निलंबन, जामिनही फेटाळला
Bribery sub-inspector of the State Excise Department in Bhusawal suspended, bail also rejected भुसावळ (13 डिसेंबर 2024) : अवैधरित्या दारू विक्री करताना कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पंटराकरवी 30 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणेंविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी बदनामी झाल्यानंतर खात्याने उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे तर भुसावळ सत्र न्यायालयाने संशयीताचा अटकपूर्व जामीनही फेटाळल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली.
असे आहे लाच प्रकरण
फैजपूर परिसरातील एका तक्रारदाराच्या घरातून 30 ते 35 हजारांचा अवैध मद्यसाठा आरोपी सोनवणेंसह पथकाने जप्त केला होता. कारवाई केल्यानंतर केस न करण्यासाठी जागीच दहा हजारांची लाच स्वीकारून पुन्हा 30 हजारांची मागणी करण्यात आल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व खाजगी पंटर किरण माधव सूर्यवंशी यास पकडण्यात आले होते मात्र उपनिरीक्षक सोनवणे ट्रॅपची कुणकुण लागताच पसार झाले होते. एसीबीने भुसावळातील आरोपीच्या घर झडतीत देशी-विदेशी दारूसह एक लाख 81 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या अवैध साठ्याबाबत जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे स्वतंत्रपणे गुन्हाही दाखल करण्यात आला. सोनवणे यांच्या घरातून रोख रक्कम, सोने खरेदीच्या 19 पावत्या तसेच नऊ एमएम बुलेटच्या दहा रिकाम्या पुंगळ्या आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या होत्या

आरोपीचे राज्य उत्पादन शुल्ककडून निलंबन
राज्य उत्पादन शुल्क विभागातील लाचखोर उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे याच्याविरोधात लाच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी निलंबित केले आहे. उपनिरीक्षक सोनवणे घटना घडल्यापासून पसार असून त्यांचा लाच लुचपत विभागाचे अधिकारी व कर्मचारी शोध घेत आहेत. लाचखोर उपनिरीक्षक सोनवणे यांच्या गुन्ह्याचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ.विठ्ठल भूगन यांनी आयुक्त कार्यालयाकडे पाठविल्यावर सोनवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अडचणी कायम : अटकपूर्वक जामीन फेटाळला
पसार असलेल्या सोनवणे यांनी भुसावळ सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. सरकारतर्फे अॅड.मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले. तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

