भुसावळात शाळा, महाविद्यालयांजवळ अवैधरित्या गुटखा विक्री करणार्‍यांवर कारवाई : बड्या साठेबाजांवर कारवाई कधी ?

सहा टपर्‍या केल्या जप्त : छोट्या विक्रेत्यांवर कारवाई मात्र मोठ्या विक्रेत्यांवर कारवाईची धमक दाखवण्याचे पोलिसांपुढे आव्हान


भुसावळ (23 डिसेंबर 2024) : शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत शाळा, महाविद्यालयाच्या 100 मीटर अंतरात असलेले पान, गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणार्‍या 12 टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत 20 रोजी कारवाई करण्यात आली तर सहा पानटपर्‍या जप्त करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असलीतरी शहरातील घाऊक विक्रेत्यांवर कारवाई करण्याची धमकी पोलीस प्रशासन कधी दाखवणार ? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर बर्‍हाणपूरहून गुटखा येतो शिवाय त्याची शहरातील विविध भागात साठेबाजी करण्यात आली असून चढ्या दराने शहरातील विक्रेत्यांना गुटखा विक्री होत असताना पोलीस प्रशासनाला हा प्रकार ठाऊक नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी झाली कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत शाळा, महाविद्यालयाच्या 100 मीटर अंतरात असलेले पान, गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे टपरी धारकांवर कोप्ता कायद्यांतर्गत कारवाईचे निर्देश मिळाल्याने पोलीस तसेच नगरपालिकेच्या पथकाने 12 टपरी धारकांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली. नगरपरिषद प्रशासनाकडुन सहा पानटपर्‍या जप्त केल्या तर यापुढे देखील वेळोवेळी मोहीम राबवुन कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.