संतोष देशमुख हत्या प्रकरण : पोलिसांचे सीडीआर तपासल्यास अनेक बाबी स्पष्ट होणार : खासदार बजरंग सोनवणे


न्यूज नेटवर्क । बीड (25 डिसेंबर 2024) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त करीत त्यांचे सीडीआर तपासण्याची मागणी पत्रकार परिषदेत खासदार बजरंग सोनवणे केली आहे.
राज्यात मस्साजोग सरपंच हत्येचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. त्यातच बीडचे खासदार बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे.

काय म्हणाले खासदार ?
आरोपींवर जातीवाचक शिवीगाळ ऐवजी साधाच गुन्हा दाखल करा म्हणून कुणाचा फोन आला? हे तपासणे गरजेचे असून तशी माझी मागणी आहे. निलंबीत केलेले पीएसआय त्या प्रकरणात सहभागी होते का? याचाही तपास करावा. 6 आणि 9 डिसेंबरच्या घटनेवरील पोलिसांच्या कारभारावर संशय असल्याचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.


पोलिस उप निरीक्षक या प्रकरणात निलंबित झाले आहेत. त्यांचा सहभाग तपासणे गरजेचे आहे. कारण पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते आरोपींबरोबर दिसत आहेत. हे खंडणीचे प्रकरण आहे पण ते वेगळे कारण त्याचा देशमुख यांच्याशी काही संबंध नाही. 9 डिसेंबरला आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर पीएसआय पाटील त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे पाटील कटात सहभागी होते का? हा प्रश्न निर्माण होतो असं बजरंग सोनवणेंनी म्हटले आहे.

संतोष देशमुख यांच्यावर पाळत ठेवली गेली. त्यांना मारत बाहेर काढले गेलं त्यानंतर त्यांचे अपहरण केले. त्यानंतर परत टाकळी फाट्यावर आणले, असे सांगितले जात आहे. पोलिस तसे सांगत आहेत. मात्र त्या दिवशी साडेचारच्या सुमारास मला फोन आला होता की, संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आहे. मी अनेक अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्या दिवशी संध्याकाळी साडेसहाला कळले की संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. ते ऐकून मला घामच फुटला, असेही सोनवणे यांनी सांगितले.

संतोष देशमुख यांची हत्या टॉर्चर करुन करण्यात आली आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. शवविच्छेदन अहवाल आला त्यात 56 वण आहेत. त्यात एकावर एक किती झाले असतील? याचा विचार न केलेलाच बरा. डोळ्यांवर, पाठीवर, पोटावर हे वण आहेत. बरगड्या मोडल्या आहेत. त्याचा गुन्हा काय होता? त्याने गावातल्या वॉचमनला मदत केली ही त्याची एवढी मोठी चूक घडली का? जर पोलिस अधीक्षकांनी वेळीच गुन्हा नोंद केला असता, तर कदाचित पुढे गोष्टी घडल्या नसत्या, असेही सोनावणे यांनी म्हटले आहे.

6 तारखेची घटना घडल्यानंतर 9 तारखेला सरपंचाच्या भावाला कोणकोण बोलले आणि पोलिस ठाण्याला कोण बोलले? असा सवाल करत पोलिसांचे सीडीआर काढा, खरा तपास करा, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौथा आरोपीला अटक केल्याचे पोलिस सांगत आहेत. परंतु सत्ताधारी पक्षातील नेते सांगतात की, आरोपीने आत्मसमर्पण केले. त्यामुळे आरोपींना अटक केली, की त्यांनी आत्मसमर्पण केले, ते कळायला हवे, असेही खासदार सोनवणे म्हणाले. अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींना कधी अटक करणार? असा सवालही खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !