ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान : भूजबळ अजित पवारांसोबत राहतील की नाही ही शंकाच !
मुंबर्ई (25 डिसेंबर 2024) : मंत्री मंडळ विस्तारात डावलल्याने छगन भूजबळ कमालीचे नाराज असून त्यांनी अलीकडे अजित पवारांवरही टीका केली होती. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना भूजबळ हे अजित पवारांसोबत राहतात की नाही ? अशी शंका असल्याचे म्हटले आहे.
भूजबळ कमालीचे नाराज
भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतरे ते नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. इतकंच नाही तर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भुजबळांनी रोष व्यक्त केला. तसेच जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं म्हणत मोठं सूचक भाष्यही त्यांनी केलं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

पवारांना न भेटण्याचा अर्थ समजला पाहिजे
ठाकरे गटाचे नेते अंबादास म्हणाले की, काहीही होऊ शकतं. आता कधी काय होईल हे सांगता येत नाही मात्र सध्या ज्या पद्धतीने छगन भुजबळ व्यक्त होत आहेत. त्याचा विचार केला तर भुजबळ हे अजित पवार यांच्याबरोबर राहतील की नाही याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न आहे. तसेच छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. मात्र, अजित पवारांना भेटत नाहीत. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी सूचक भाष्य केलं.




